ठाणे : शहरातील शौचालयांच्या दुरुस्तीबरोबरच तिथे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची कामे सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असतानाच, वागळे इस्टेटमधील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर भागातील सुलभ शौचालयाची दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात महिलांनी आक्रमक होऊन सोमवारी रात्री शौचालयाला टाळे लावले. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते नुतनीकरणानंतर सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे कामे प्रशासनाने हाती घेतली होती. यासाठी राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी पालिकेला देऊ केला आहे.
हेही वाचा : कोकण किनारपट्टी ‘सिडको’ला आंदण; विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती, ‘नगरविकास’च्या अधिकारांना कात्री
शौचालयांच्या नुतनीकरण आणि दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतानाच, वागळे इस्टेटमधील स्वातंत्र्यवीर सावरकरनगर भागातील सुलभ शौचालयाची दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. या शौचालयाच्या दुरावस्थेचा पाढा महिलांनी वाचून या शौचालयाला टाळे लावले आहे. शौचालयात नळ आणि पाणी नाही, दरवाजा नाही, महिला शौचालयात व्यसन करणारी मुले असतात आणि कर्मचारी तैनात नसतो. यामुळे येथील चाळीतील वस्तीतील नागरीकांची गैरसोय होत आहे, असा आरोप महिलांनी केला आहे.