ठाणे : माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाने १५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका स्विकारतील असे सांगण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला अंगणवाडीत जाताच त्यांना शेजारील दुकानांमधून अर्ज विकत घेण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी केंद्रांवर उघडकीस आला आहे. दुकानदारांकडे सरकारी योजनेचे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. सुरुवातीला हे अर्ज प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मार्फत भरले जात होते. त्यानंतर, या योजनेचे संकेतस्थळ तसेच ॲप्लिकेशन तयार करण्यात आले. त्यामुळे अनेक महिलांनी घरबसल्या या योजनेचा अर्ज भरला होता. अर्ज ऑफलाईन भरलेला असो किंवा ऑनालईन या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नव्हते. यापैकी ज्या महिलांच्या अर्जाला मंजूरी मिळाली, त्यांच्या खात्यावर ऑगस्ट महिन्यापासून योजनेचा हफ्ता येण्यास सुरुवाती झाली. परंतू, या योजनेसाठी महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून सरकारने या योजनेचा अर्ज भरंण्यासाठी मुदत वाढ दिली. परंतू, हे अर्ज केवळ अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत भरता येतील, असे सांगण्यात आले. सरकारकडून १५ ऑक्टोबर पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानुसार, अंगणवाडी केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासून महिलांच्या रांगा लागत होत्या. परंतू, ठाणे शहरातील काही केंद्रांवर महिलांना योजनेचा अर्ज शेजारील दुकानांमधून पाच किंवा दहा रुपयास विकत घेण्यास सांगितले जात होते. त्यामुळे महिलांची अंगणवाडी केंद्रावर तसेच दुकानांमध्ये गर्दी होत होती. परंतू, सरकारी योजनेचा हा अर्ज खासगी दुकान चालकांकडे पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरकारने सुरुवाती या योजनेचा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचे शुल्क स्विकारले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. परंतू, आता याच योजनेचा अर्ज विकत घ्यावा लागला असल्यामुळे महिलांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. यासंदर्भात, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता, यांसदर्भात माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : कल्याण: किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ संस्थेचा संचालक लाखाची लाच घेताना अटकेत

ठाण्यातील वागळे इस्टेट भागात लाडकी बहीण योजनेचे अर्ज विक्री

ठाण्यातील वागळे इस्टेट, इंदिरानगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर परिसरात असलेल्या काही खासगी दुकानांमध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज विक्री केली जात असल्याची घटना समोर आली आहे. लोकमान्य नगर परिसरात असलेल्या अंगणवाडी बाहेर महिलांची लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी होत आहे. या अंगणाडीच्या शेजारीच एक झेरॉक्सचे दुकान आहे, या दुकानातून अर्ज विकत घ्यावे असे अंगणवाडीतून महिलांना सांगितले जात आहे. या दुकानांमध्ये पाच ते दहा रुपयांना हा अर्ज दिला जात आहे. नक्की असा प्रकार घडत आहे का, हे तपासण्यासाठी प्रस्तूत प्रतिनिधीने हा अर्ज विकत घेतला. तेव्हा ही बाब निदर्शनास आली. असाच प्रकार इंदिरा नगर, सावरकर नगर भागातही सुरु असल्याचे समोर आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane women need to purchase ladki bahin yojana scheme application forms from private shopkeepers css