ठाणे : भिवंडी येथे दुकानामध्ये निघालेल्या तरुणाचा भावासमोरच टेम्पो अंगावरून गेल्याने चिरडून मृत्यू झाला. ही घटना मुंबई नाशिक महामार्गावर झाली. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथील गोकुळनगर परिसरात २६ वर्षीय हिमांशु अग्रवाल हा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. हिमांशु आणि त्याचा भाऊ दिपक या दोघांचा पडघा येथे हार्डवेअर वस्तू विक्रीचे दुकान आहे. ३० मार्चला सकाळी ७ वाजता हिमांशू आणि दिपक हे दोघेही दुचाकीने दुकानात जाण्यासाठी निघाले होते. हिमांशू हा दुचाकी चालवित होता तर दिपक त्याच्या मागे बसला होता.
दोघेही मुंबई नाशिक महामार्गावर आले असता, कुंदर गाव परिसरात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एका टेम्पो चालकाने अचानक त्याचा टेम्पो गोदामाच्या दिशेने जाण्यासाठी वळविला. त्यामुळे त्या टेम्पोने हिमांशू यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात हिमांशू आणि दिपक दोघेही दुचाकीवरुन खाली पडले. टेम्पोचे चाक हिमांशू यांच्या अंगावरून गेले. तर दिपक देखील या अपघातात जखमी झाले.
अपघातानंतर टेम्पो चालक थांबला नाही. तो गोदामाच्या दिशेने टेम्पो घेऊन पळून गेला. हिमांशू यांच्या डोक्याला, चेहऱ्यावर, हाता-पायाला गंभीर दुखापती झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात दिपक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला आहे.