ठाणे : हळदी समारंभामध्ये नाचत असताना धक्का लागल्याने दोन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाची धारदार चाकू गळ्यात भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहापूर भागात उघडकीस आला आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह दुचाकीवर नेत भातसा नदीच्या प्रवाहात फेकून दिला. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी १७ वर्षीय मुलांना ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलांच्या या कृत्याने शहापूर हादरले आहे.

शहापूर येथील शिल्लोत्तर गावात राहणारा बाळू वाघ (२१) हा वीटभट्टीवर काम करत होता. २५ मार्चला तो नातेवाईकाच्या हळदी समारंभात गेला होता. परंतु तो रात्री उशीरापर्यंत घरी परतला नव्हता. त्यामुळे त्याच्या आजीने याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. २८ मार्चला बाळू याचा मृतदेह भातसा नदीमध्ये कासगाव या हद्दीत आढळून आला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याचे प्रेत शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आले होते. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महादेव जाधव यांनी या प्रेताचे निरीक्षण केले असता, बाळू याच्या गळ्यावर मोठी जखम आढळून आली होती. तसेच त्याचा चेहरा जलचरांनी कुडतडलेला होता. उपजिल्हा रुग्णालयात न्यायवैद्यक तज्ञ नसल्याने बाळूचे प्रेत मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. २९ मार्चला त्याच्या मृत्यूचा अभिप्राय पोलिसांना मिळाला. त्यामध्ये बाळूचा मृत्यू अनैसर्गिक असून भोसकल्याने झाल्याचे समोर आले.

हळदीला बाळूचे काका उपस्थित होते. पोलिसांनी बाळू वाघ याच्या काकाची विचारणा केली असता, त्यांनी हळदीच्या कार्यक्रमात बाळू याचा दोन अल्पवयीन मुलांसोबत वाद झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांची विचारणा केली असता, २५ मार्चला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास नाचताना धक्का लागल्याने बाळू सोबत वाद झाला होता अशी कबूली त्यांनी दिली. तसेच बाळूला दोघांनी मारहाण करुन मंडपाच्या मागील बाजूस नेले. तिथे एका अल्पवयीन मुलाने बाळूच्या गळ्यात चाकू भोसकला. तर दुसऱ्या तरुणाने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह दुचाकीवर ठेवला. पुरावा नष्ट करण्यासाठी कासगावच्या हद्दीत भातसा नदीच्या वाहत्या प्रवाहात त्याचा मृतदेह फेकून दिला. याप्रकरणी मुलाच्या आजीने तक्रार दाखल केल्यानतर ३० मार्चला दोन्ही अल्पवयीन विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.