कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरिकांचे आरोग्य सुदढ असले पाहिजे, शहरातील कचऱ्याची समस्या कायमची मिटून शहर सार्वजनिक स्वच्छतेमध्ये अग्रक्रमावर असले पाहिजे, या विचारातून गुरुवारी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सादर केलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य, घनकचरा विभागावर सर्वाधिक जोर दिला आहे.
आगामी पालिका, लोकसभा निवडणुकांचा विचार करून विशिष्ट समाजाला मतांच्या जोगव्यासाठी बांधून ठेवण्यासाठी शासन निधीतून कल्याण लोकसभा हद्दीत स्मारक, समाज भवन, सुशोभिकरणावर भर देण्यात आला आहे. सन २०२३-२४ चा दोन हजार २०६ कोटी ३० लाख रुपये जमा, दोन हजार २०५ कोटी २० लाख खर्च आणि एक कोटी १० लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
परिवहन विभाग आणि पालिकेचा मूळ अर्थसंकल्प आज स्वा. सावरकर सभागृहात सादर करण्यात आला. परिवहन विभागाचा अर्थसंकल्प महाव्यवस्थापक डाॅ. दीपक सावंत यांनी आयुक्त डाॅ. दांगडे यांना सादर केला. यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, सचिव संजय जाधव उपस्थित होते. करोना महासाथीमुळे पालिकेचा मागील दोन वर्षांत झालेला खर्च, घटलेले उत्पन्न आणि मागील वर्षी संगणकीकरण उन्नत्तीकरणामुळे झालेल्या गोंधळाचा आर्थिक फटका प्रशासनाला महसुली उत्पन्नातून सर्वाधिक बसला. पालिकेवर मागील अनेक वर्षांचे सुमारे अकराशे कोटींचे दायित्व आहे. हे सगळे आर्थिक अरिष्ट समोर उभे असताना हाती लागलेले महसुली उत्पन्न, शासन निधीची जुळवाजुळव करत मागील वर्षापेक्षा ४३२ कोटीने अधिकचा शिलकी अर्थसंकल्प यावेळी सादर केल्याची फुशारकी मारून प्रशासनाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे.
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांच्या वेशीवरील वाढती गृहसंकुले, त्याचा शहरांतर्गत, रेल्वे स्थानकावर येणारा ताण याचा विचार करून प्रशासनाने विकास आराखड्यातील अनेक वर्षांचे महत्तवाचे रस्ते हाती घेणे आवश्यक होते. त्याचा कोठेही विचार अर्थसंकल्पात नाही. बेकायदा बांधकामांमुळे शहराचे नियोजन धोक्यात आले आहे. या बेकायदा बांधकामांच्या समूळ उच्चाटनाविषयी अर्थसंकल्पात एकही शब्द नाही.
आरोग्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका हद्दीत दोन सर्वोपचारी रुग्णालये उभारा. शासन त्याला पूर्ण सहकार्य करील, असे आश्वासन दिल्याने ९० फुटी रस्त्याजवळील कचोरे गावात १५० रुग्णशय्येचे रुग्णालय उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. अन्य एका सर्वोपचारी रुग्णालयाचे नियोजन प्रशासन करत आहे, असे आयुक्त डाॅ. दांगडे यांनी सांगितले. २० लाख लोकसंख्येसाठी १६ आरोग्य केंद्रे अपुरी पडत आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून शहराच्या विविध भागांत ६८ आनंदी आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. पाथर्ली येथे प्रसुतीगृह, कर्करोग, केमोथेरेपी, कॅथलॅब केंद्र उभारण्यात येणार आहेत. येथे नागरिकांना माफक दरात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शास्त्रीनगर, रुक्मिणीबाई रुग्णालय येथे अद्ययावत रोग निवारण केंद्र उभारले जाणार आहे.
घनकचरा
शहर स्वच्छ सुंदर राहण्यासाठी एक खासगी एजन्सी नियुक्ती केली जाणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, नियमितची सफाई, रस्त्यावरील कचरा साठवण केंद्र बंद करणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणे हे उपक्रम पालिकेकडून हाती घेतले जाणार आहेत. आधारवाडी कचराभूमी कायमची बंद करून तेथे उद्यान, बगीचे, विरंगुळा कट्टासारखे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या कामासाठी शासनाने ११९ कोटी पैकी ४२ कोटी उपलब्ध करून दिले आहेत. १० प्रभाग हद्दीत १० आसनांचे प्रत्येकी एक फिरते स्वच्छतागृह उभे केले जाणार आहे. उंबर्डे येथे प्रदूषण नियंत्रण नियमावली बसविली जाणार आहे. मांडा येथे १५० टन क्षमतेचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारला जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – जुन्या कळवा पुलाच्या दुरुस्तीस सुरुवात; पूल पूर्ण झाल्यास होणार एकेरी पद्धतीने वाहतूक
निवडणुकीसमोरील कामे
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विशिष्ट समाजाला खूष करण्यासाठी शासनाच्या मूलभूत सुविधांतर्गत अनुदानातून कल्याण लोकसभा हद्दीत कल्याण पूर्वेतील उत्तर भाषकांची संख्या विचारात घेऊन नेतिवली येथे उत्तर भारतीय भवन, चक्कीनाका येथे शिवाजी महाराज स्मारक, डोंबिवलीत आयरे गाव येथे दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी सभागृह उभारणे, निळजे खाडीकिनारा सुशोभिकरण, कल्याणमधील बैलबाजार भागातील गोविंदवाडी रस्ता पुनर्पृष्ठीकरण, चक्कीनाक ते मलंग रस्ता, सावळाराम महाराज संकुल ते टाटा पाॅवर रस्ता ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.