बदलापूरः मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीचाच वरचष्मा राहिला आहे. जिल्ह्यात एकूण ६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका संपन्न झाल्या. त्यात शिवसेना भाजपने ४१ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तर उर्वरित ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि स्थानिक समित्यांचा विजय झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. तर उर्वरित ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याने येथे निवडणुका झाल्या नाहीत. संपूर्ण जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या ४८ ठिकाणी थेट सरपंचपदासाठी १३५ उमेदवार रिंगणात होते. तर ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडीसाठी एक हजार २७९ उमेदवारांनी सहभाग घेतला. रविवारी पार पडलेल्या मतदानात ७२.८३ टक्के मतदान झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्यातील निकालाकडे राज्याच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी भिवंडी हा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मतदारसंघ असल्याने येथे भाजप काय कामगिरी करते याकडेही सर्वांचेच लक्ष होते. ठाणे जिल्ह्यातील एकूण ६१ ग्रामपंचायतींमध्ये ४१ जागांवर महायुतीचा विजय झाल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. यात भाजप मोठा पक्ष ठरला असून २५ ग्रामपंचायतींमध्ये भाजप, १६ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना शिंदे गट तर ११ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय झाला आहे. इतर ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि स्थानिक समित्यांचे उमेदवारांनी बाजी मारली आहे.
हेही वाचा >>>ठाण्यात आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
मुरबाड तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायतींवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवल्याचा दावा केला असून भाजपने १३ ग्रामपंचायतींवर तर शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाने एका ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचे सांगितले आहे. शहापूर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीपैकी ८ ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय मिळवल्याचा दावा केला आहे. तर महायुतीनेही ८ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने देखील ३ ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतीत पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक २६ ग्रामपंचायतींवर तर, शिवसेना (शिंदे गट) १६, उबाठा गट ११ तर, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने तीन ग्रामपंचायतींवर आपला दावा केला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची सरशी झाली असल्याचे दिसून आले.