आशीष धनगर

दिवा स्थानकालगतच्या तलावात भराव टाकून बेकायदा बांधकामे

बेसुमार बेकायदा बांधकामांनी व्यापलेल्या दिव्यातील तलावांलगतही अतिक्रमणाचा विळखा वाढू लागला आहे. दिवा स्थानकालगत पूर्व भागात असलेल्या तलावात मातीचा भराव टाकून दुकाने उभारण्यात येत आहेत. तलावालगतच वाहनतळ उभारण्यात आले असून संरक्षक भिंत तोडण्यात आली आहे. तलावाची एक बाजू बुजवून हे अतिक्रमण सुरू आहे.

ठाणे शहरातील तलावांसाठी मोठा निधी खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र गैरसोयींचे आगार झालेल्या दिवा भागातील तलाव मात्र सुशोभीकरणापासून वंचित आहेत. दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेने या तलावाभोवती संरक्षक भिंत बांधली, मात्र रेल्वे स्थानकाकडून साबे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत तलावात माती टाकून दुकान उभारण्यात आले आहे. या दुकानाला लागूनच तलावात माती टाकण्यात येत असून तेथे वाहनतळ उभारण्यात आला आहे. फेरीवाले कचरा तलावात टाकतात. पाणी दूषित होत असून त्यावर हिरवळ जमली आहे. अशाच प्रकारे माती टाकून बांधकामे केली गेल्यास तलावाचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.

तलावाशेजारी असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यात येतील. काठावरील कोंबडीच्या दुकानामुळे तलावाचे पाणी दूषित होत असेल तर त्या दुकानावर कारवाई करण्याची जबाबदारी ही पशुवैद्यकीय विभागाची आहे. त्यासंदर्भात आम्ही पशुवैद्यकीय विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे.

– महादेव जगताप, साहाय्यक आयुक्त, दिवा प्रभाग समिती, ठाणे महानगरपालिका

Story img Loader