ठाणे: जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने निराधार मुलांची दत्तक प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान मागील तीन ते चार वर्षाच्या कालावधीत मुलींना अधिक पसंती दिली जात असल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले होते. याच पद्धतीने यावर्षी देखील जिल्हा महिला बालविकास विभागाने दत्तक प्रक्रिया राबविली असून याद्वारे ४१ मुले दत्तक घेण्यात आली आहेत. यामध्ये १४ मुले तर २७ मुलींचा समावेश आहे. यामुळे बहुतांश पालकांचा कन्या दत्तक घेण्याकडे ओढा कायम असल्याचे दिसून आले आहे. तर यातील काही बालकांना परदेश स्थित दाम्पत्यांनी दत्तक घेतले आहे.
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली येथील जननी आशिष शिशु केंद्र आणि नेरुळ येथील विश्व बालक ट्रस्ट या दोन शासनमान्य संस्थांकडून निराधार मुलांचा योग्य पद्धतीने सांभाळ करता येतो. तसेच येथील मुले योग्य कुटुंबात दत्तक कसे जातील यासाठी येथील कर्मचारी आणि महिला बाल विकास विभागाचे अधिकारी प्रयत्नशील असतात. जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही बालसंगोपन केंद्रे चालविण्यात येतात. या विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीतून मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले असल्याची बाब समोर आली आहे.
हेही वाचा… मुरबाड, शहापूरमधील बालकांना कुपोषणाचा विळखा; अकराशेहून अधिक बालके कुपोषित
डोंबिवली आणि नेरुळ येथील बालसंगोपन केंद्रातून मूल दत्तक पालकांना मोठ्या प्रक्रियेतून सामोरे जावे लागते. देशांतर्गत पालकांना आणि देशाबाहेरील पालकांनादेखील या केंद्रांमधून मूल दत्तक घेण्याची शासनातर्फे मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांमधून मुलांना दत्तक घेण्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन संस्था (कारा) या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत पालकांची चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. यानंतर संपूर्ण प्रक्रिया राबत मुलांना दत्तक देण्यात येते.
चौकट
या वर्षात ठाणे जिल्ह्यात एकुण ४१ मुले दत्तक देण्यात आलेली आहेत. यामध्ये मुले १४ आणि मुली २७ आहेत. ० ते ६ या वयोगटातील बालके दत्तक गेलेली आहेत. दत्तक गेलेली बालके प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, तेलंगणा, बँगलोर तसेच देशाबाहेर स्पेन, इटली, यु.एस. ए. , कॅनडा या देशात बालके दत्तक गेलेली आहेत. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात प्रतीक्षा यादीत साधारण ५२५ पालक आहेत. तर दत्तक प्रक्रिया अंतर्गत ऑनलाईन नोंदणी केलेले परंतु कागदपत्रांची पूर्तता न केलेले एकुण ३७५ पालक आहेत.
राज्य शासनाच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत जिल्ह्यात यावर्षी ४१ मुले दत्तक देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली आहे. – महेंद्र गायकवाड, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे