बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यातच आता सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पाणी वितरण यंत्रणेवरही परिणाम होऊ लागल्याने बदलापुरकर पाण्यापासूनही वंचित राहत आहेत. गुरूवारी शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला नाही. तर बुधवारची रात्रही नागरिकांना विजेविना काढावी लागली. त्यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडते आहे. नोकरी, कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्याही वेळापत्रकावर परिणाम होतो आहे.
गेल्या आठवडाभरापासून बदलापूर शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. मध्यरात्री ऐन झोपेच्या वेळीच वीज गायब होत असल्याने नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले आहे. आधीच गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. दिवसा दररोज पारा ४१ अंश सेल्सियसवर असतो. वाढत्या पाऱ्याचा परिणाम सायंकाळी उशिरापर्यंत जाणवतो. रात्रीही वातावरणात उष्ण हवा जाणवते. त्यामुळे नागरिकांना रात्रीही घामांच्या धारात काढावे लागतात. त्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज रात्री ११ ते १२ च्या सुमारास वीज गायब होते आहे. बुधवारी रात्रीही रात्रीच्या सुमारास बदलापुरातील बहुतांश भागात वीज गायब झाली. काही भागात २० ते २५ मिनिटात वीज पुरवठा सुरळीत झाला. मात्र काही भागात दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडीत होता. त्यामुळे बुधवारची रात्रही बदलापुरकरांना घामांच्या धारात काढावी लागली. या विजेअभावी चाकरमान्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. उष्णतेमुळे नागरिक इमारतींखाली, रस्त्यांवर उतरत असल्याचे चित्र रात्रीच्या सुमारास पहायला मिळते. अनेकांना पहाटेच्या सुमारास लोकल पकडून कार्यालय गाठावे लागते. मात्र त्याच्याही कामावर परिणाम होऊ लागला आहे.
हेही वाचा… ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
हेही वाचा… हाईट बॅरियर तुटल्याने ठाणे बेलापूर मार्गावर मोठी कोंडी
पाणी पुरवठ्यावर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून वीजेच्या लपंडावामुळे हैराण असलेल्या बदलापुरकरांच्या संकटात बुधवारी पाण्याचीही भर पडली. सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बॅरेज येथील केंद्रात बिघाड झाला. त्यामुळे बुधवारी सायंकाळी आणि गुरूवारी सकाळ बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे वीज नाही आणि पाणीही नाही अशी परिस्थिती होती.