ठाणे : ‘स्टेज शो’मध्ये काम देतो असे सांगून मुंब्रा शहरातील एका महिलेला डान्सबारच्या कामामध्ये ढकलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिने काम करण्यास नकार दिल्यानंतर तिच्याकडून सुटकेसाठी पैशांची मागणी होऊ लागली. अखेर मुंब्रा पोलिसांच्या मदतीने तिची सुखरुप सुटका झाली.
मुंब्रा येथे २७ वर्षीय पीडित महिला तिच्या पतीसोबत वास्तव्यास आहे. तिला नृत्याची आवड आहे. त्यामुळे ठाणे परिसरात विविध ‘स्टेज शो’मध्ये ती भाग घेत असते. काही दिवसांपूर्वी तिला व्हाॅट्सॲपद्वारे एक संदेश प्राप्त झाला. दुबईमध्ये ‘स्टेज शो’साठी महिलांची गरज असून चांगले पैसे मिळणार असे त्या संदेशामध्ये म्हटले होते. त्यामुळे तिने संदेश पाठविणाऱ्या महिलेला याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिला स्टेज शोच्या माध्यमातून दीड ते दोन लाख रुपये प्रतिमहा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. चांगले पैसे मिळणार असल्याने तिने कामास होकार दर्शविला. तरुणीला एका एजंटच्या माध्यमातून दुबई येथे नेले. परंतु तिथे गेल्यावर स्टेज शोमध्ये काम नसून एका डान्सबारमध्ये काम असल्याचे समजले. हे काम करण्यास तिने नकार दिला. तिने घरी जाण्याची विनंती केली असता, तिच्याकडून अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तिला तिथे मानसिक त्रास देण्यात आला. तसेच केवळ एकवेळ जेवण दिले जात होते. तिने तिच्याबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती पती फोनवरून कळवली. त्यानंतर तिच्या पतीने तात्काळ मुंब्रा पोलीस ठाणे गाठले.
हेही वाचा – ठाण्यात चिनी मांजा, चिनी दोरा वापरणे पडणार महागात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सोनी शेट्टी, पोलीस शिपाई समाधान जाधव यांनी एजंटला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर तेथील व्यक्तींशी संपर्क साधून पोलिसांनी तिला सुखरूप मुंबईत आणले. या घटनेनंतर सुटका झालेल्या तरुणीने मुंब्रा पोलिसांचे आभार मानले.