ठाणे: महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी डायघर येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी या प्रकल्पात प्रायोगिक तत्वावर १५ टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली. या प्रकल्पात कचऱ्यापासून वीज तसेच बायो सीएनजी गॅसची निर्मीती केली जाणार असून सुरूवातीला प्रकल्पात बायो सीएनजी गॅसची निर्मीती केली जाणार आहे. यामुळे गेले १४ वर्षे कागदावर असलेला प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.
ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्प २५ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचे लेखी आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर पालिका प्रशासनाने डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु डायघर प्रकल्पास तेथील स्थानिकांनी विरोध सुरू केल्याने महापालिकेसमोर कचरा पेच निर्माण झाला होता. माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह डायघर भागातील स्थानिकांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर डायघर घनकचरा प्रकल्प कशाप्रकारे राबविला जाणार आणि त्याचा नागरिकांना त्रास कसा होणार नाही, याचे प्रात्यक्षिक ठाणे महापालिका घनकचरा विभागाने सोमवारी स्थानिकांना दाखविले. त्यापाठोपाठ हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिस बंदोबस्तात या प्रकल्पात १५ टन कचऱ्यावर प्रक्रीया करून प्रकल्पाची चाचणी बुधवारी घेण्यात आली. यामध्ये या प्रकल्पातील यंत्र योग्य पद्धतीने चालतात का आणि कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते का याची चाचपणी करण्यात आली.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १ हजार मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. त्यात ६० टक्के ओला आणि ४० टक्के सुक्या कचऱ्याचा समावेश आहे. या कचऱ्यावर डायघर प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून कचऱ्यापासून वीज आणि सीएनजी गॅसची निर्मीती केली जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे २० मेगा वॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी १८ ते २० महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासाठी जर्मनी येथून यंत्रे आणली आहेत. तसेच हा प्रकल्प पूर्णपणे बंदीस्त स्वरुपात असणार असून त्यातून कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येणार नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. सुरूवातीला प्रकल्पात बायो सीएनजी गॅसची निर्मीती केली जाणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी चालक, सुरक्षा रक्षक, कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.