ठाणे : गुढीपाडव्यानिमित्त यंदा मुख्य यात्रेसह शहरातील काही भागांमध्ये उपयात्राही निघणार असून या यात्रांची तयारीही आयोजकांकडून जल्लोषात सुरू आहे.
मराठी नववर्षांचे स्वागत शहरात प्रत्येक भागातील नागरिकांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने करावे यासाठी यंदाच्या वर्षी मुख्य यात्रेसह शहरात पाच ते आठ वेगवेगळय़ा भागांतून उपयात्रा निघणार आहेत. कळवा, खारेगाव लोकमान्य नगर, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर, लोढा या भागांतून उपयात्रा निघणार असल्याची माहिती श्री कौपिनेश्वर न्यासतर्फे देण्यात आली.
श्री कौपिनेश्वर न्यासच्या साहाय्याने उपयात्रेच्या आयोजकांनीही मराठी नववर्ष स्वागत यात्रेची जल्लोषात तयारी सुरू केली आहे. मुख्य यात्रेच्या संकल्पनेवरच या उपयात्रा निघणार आहेत. शहरातील वसंत विहार भागातील काही गृहसंकुलातील रहिवासी दरवर्षी श्री कौपिनेश्वर न्यासच्या मुख्य यात्रेत सहभागी होत असत. परंतु, यंदाच्या वर्षी करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन एका ठिकाणी एकत्र येण्यापेक्षा या भागातील नागरिकांना एकत्र घेऊन न्यासाच्या साहाय्याने उपयात्रा काढण्याचे नियोजन केले आहे.
वसंत विहार भागातील हनुमान मंदिर येथून या यात्रेची सुरुवात होणार आहे. या यात्रेत दोन ते तीन चित्ररथ असणार असून यामध्ये इस्कॉन आणि लक्ष्मीनारायण गृहसंकुलाचा रथ असणार आहे. तसेच यात्रेच्या मार्गावर काही ठरावीक ठिकाणी पथनाटय़, लेझीम, नृत्य त्यासह मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत. या भागातील महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषेत यात्रेत सहभागी होणार आहेत.
लोकमान्यनगर उपयात्रेमार्फत बेटी बचाव बेटी पढावचा संदेश
लोकमान्यनगर नगर भागातूनही यंदा जल्लोषात मराठी नववर्षनिमित्त उपयात्रा निघणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून यंदा बेटी बचाव बेटी पढावचा संदेश दिला जाणार आहे. तसेच मराठी नववर्षांच्या पूर्वसंध्येला या भागातील २० ते २५ मंदिरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. या यात्रेमध्ये वारकरी पथक, लेझीम पथक, महिलांची कलश यात्रा पाहायला मिळणार आहे. त्यासह जागरण आणि गोंधळाचे गीत सादर करण्याचाही आयोजकांचा प्रयत्न आहे.