कल्याण : टिटवाळा बल्याणी भागात आपल्या मित्रांकडे मोटारीने गेलेल्या कल्याण तालुक्यातील मोहिली गावातील एका शेतकऱ्याला आंबिवली भागातील अली इराणी आणि त्याच्या तीन साथीदारांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत वाहनासह जीवंत जाळण्याच्या आणि मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात संतोष शिंगोळे (४९) या शेतकऱ्याने तक्रार केली आहे. पोलिसांनी अली इराणी आणि त्याच्या तीन साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अली इराणी यापूर्वी संघटित गुन्हेगारी कायद्याखालील गुन्हेगार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
शेतकरी संतोष शिंगोळे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण टिटवाळा वासुंद्री भागातील आपल्या मित्राकडे मोटारीने संध्याकाळच्या वेळेत गेलो होतो. तेथून रात्री साडे नऊच्या दरम्यान परत येत असताना बल्याणी आंबेडकर चौक येथे आपल्या दोन मित्रांना आपण गाडीत घेतले. तेथून बल्याणीकडे मोटारीने जात असताना बल्याणी आंबेडकर चौक भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर अली इराणी उभा होता. त्याने माझ्याकडे काय बघतो. असा प्रश्न मला केला. त्यावेळी मी बघितलेच नाही तर तुझी अडचण काय, असा प्रश्न अली इराणी याला केला. त्यावेळी मी या भागातील कोण आहे हे तुला माहित आहे का. जास्त आवाज केला तर तुला तुझ्या साथीदारांसह गाडीसकट जाळून टाकीन अशी धमकी शिंंगोळे यांना दिली.
अली इराणीने शिंगोळे यांच्या वाहनाची चावी काढून घेतली. शिंगोळे यांच्या बरोबर हुज्जत घातली. त्यावेळी अलीचे तीन साथीदार आले त्यांनीही शेतकरी शिंगोळे यांना मारहाणीच्या धमक्या दिल्या. अलीने वाहनाच्या चाव्या परत देत चल येथून झटकन निघून जा नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी शिंगोळे यांना दिली. या सगळ्या प्रकाराची शिंगोळे यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
शिंगोळे यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे, रामदास भुवर हे तातडीने आंबिवली बल्याणी भागात पोहचले. तेथे जमाव जमला होता. जमावाने पोलिसांना सांगितले इक्बाल अन्सारी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर संतोष शिंगोळे आणि अली यांचे भांडण झाले आहे. पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाची तोडफोड झाल्याचे आणि तेथे भांडण करणारे इसम पळून गेले असल्याचे समजले. पोलिसांनी दोन पंचांसमक्ष पक्ष कार्यालयाची झडती घेतली. त्या कार्यालयात त्यांना एक तलवार, एक सुरा (गु्प्ती), मोबाईल आढळून आला. शस्त्रासह मोबाईल पोलिसांनी जप्त करून अली आणि साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.