कल्याण : जमिनीच्या वादातून सावत्र भावाला लोखंडी सळईने मारहाण करून त्याची हत्या करणाऱ्यास कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्र. र. अष्टुकर यांनी १० वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विष्णु राजाराम रामगुडे असे कारावास झालेल्या आरोपीचे नाव आहे. तुकाराम रामगुडे असे मृताचे नाव आहे. हे दोघे सावत्र भाऊ आहेत. रामगुडे कुटुंब उल्हासनगर येथे राहते. तुकाराम हे अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. विष्णु आणि तुकाराम यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. जानेवारी २०१७ मध्ये तुकाराम रामगुडे ऑर्डनन्स फॅक्टरीतून रात्रपाळी करून घरी आले होते. ते घरात बसले होते. त्यावेळी विष्णु रामगुडे तुकाराम यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करू लागला. तुकाराम यांनी घराबाहेर जाऊन विष्णु यांना तू शिवीगाळ कशासाठी आणि कोणाला करतो, असा प्रश्न केला. त्याचा राग विष्णुला आला. त्याने हातामधील लोखंडी सळईने तुकाराम यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने विष्णुने हा हल्ला केला होता, असे तुकारामची पत्नी वंदना यांनी पोलीस, न्यायालयातील जबाबात म्हटले आहे.

हेही वाचा : कल्याण: २७ गावांमधील पथदिवे कामांसाठी फेरनिविदा

या झटापटीच्यावेळी तुकाराम यांची पत्नी मध्ये पडून तुकाराम यांना विष्णुच्या मारहाणीपासून वाचविले. लोखंडी सळईचे घाव वर्मी बसल्याने तुकाराम रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना मध्यवर्ति रुग्णालय, तेथून खासगी रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना काही महिन्यांनी तुकाराम यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : यंदाचा गणेशोत्सव बचत गटांसाठी आर्थिक फलदायी, विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीतून १५ लाखांहून अधिकची आर्थिक उलाढाल

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला होता. कल्याण न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून सबळ पुराव्यांच्या आधारे विष्णु रामगुडे याला १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. एस. आर. कुलकर्णी, ॲड. इघारे, आरोपीतर्फे ॲड. भोपी यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस. पी. आहेर, हवालदार के. पी. घरत यांनी केला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ulhasnagar 10 years rigorous imprisonment for murder of brother due to land dispute css