उल्हासनगरः फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांत झाले आणि त्यातूनच तरूणीवर अत्याचार करून त्याची चित्रफीत तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. आरोपीने हीच चित्रफित दाखवत त्या तरूणीवर सातत्याने अत्याचार केले. पिडीतेने विरोध करताच आरोपीने एक चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारीत केली. याचा तरूणीला धक्का बसला. मात्र तिने पुढे येत पोलिसात धाव घेतल्याने आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार गेल्या काही वर्षात समोर आले आहे. उल्हासनगरात अशाच एका प्रकरणात प्रेमाच्या नावाने फसवणूक करत तरूणीवर अत्याचार करण्यात आले. पिडीत तरूणी आणि आरोपीची ओळख समाज माध्यमावर झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित आणि पुढे प्रेमात झाले. प्रेमातून तरूणीला आरोपीने शरिरसंबंधांसाठी एका हॉटेलवर नेले. मात्र आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने लपून या सर्व प्रकाराचे चित्रण करत चित्रफिती तयार केल्या. त्या चित्रिकरणावरून तरूणीला धमकी देत त्याने तरूणीला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबावही टाकला.
आरोपीने या घटनेचेही गुप्तपणे चित्रीकरण करून, पुन्हा पुन्हा धमकी देत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. पीडितेने याला विरोध केला. त्यामुळे आरोपीने एक चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारीत केली. तसेच उर्वरित चित्रफितही प्रसारीत करण्याची धमकी आरोपीने दिली. या संपूर्ण प्रकारामुळे पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला होता. मात्र तिने हिमतीने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तरूणीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. तरूणीच्या तक्रारीच्या आधारावर पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने जलद हालचाल करत आरोपी पंकज राममनोहर शुक्ला (२५) याला अटक केली. तो बदलापूरमधील शिवाजी चौक येथे वास्तव्यास होता. हा आरोपी मूळचा उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील इटिया ठोक गावचा आहे, अशी माहिती उल्हासनगर पोलिसांनी दिली आहे.
अटक करण्यात आल्यानंतर आरोपीला न्यायालयात सादर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास उल्हासनगर पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीकडून आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उल्हासनगर शहरात संताप व्यक्त होतो आहे. समाज माध्यमातून मैत्री करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जाते. मात्र त्यानंतरही असे प्रकार होत असल्याचे दिसून आले आहे.