आपल्या पाळीव श्वानाची योग्य सुरक्षितता न घेता, बाहेर फिरण्यास सोडलेल्या श्वानाने शेजारच्या महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. हल्ला झालेल्या महिलेने याप्रकरणी तक्रार केल्याने पोलिसांनी श्वान मालकावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला.
महेश पुनवाणी (४८, रा. बॅरेक क्रमांक ५४७, सोन्नार गल्ली, उल्हासनगर-२) असे पाळीव श्वान मालकाचे नाव आहे. कोमल सुरेश नागदेव (४८) असे श्वान हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या सोन्नार गल्ली भागात राहतात.
हे ही वाचा… बेकायदा इमारत तोडण्यास विरोध करणाऱ्या आंदोलनातील भूमाफियांचा डोंबिवलीतून पळ?
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार कोमल आणि महेश हे शेजारी आहेत. महेश यांच्या घरात त्यांचा पाळीव श्वान आहे. पट्टा बांधून त्याला घरात बांधून ठेवलेले असते. मंगळवारी दुपारी जखमी कोमल नागदेव घरात धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या बाहेरील मोकळ्या खोलीत आल्या. तेथे कपडे वाळत घालत असताना कोमल यांना काही कळण्याच्या आत महेश पुनवाणी यांच्या पाळीव श्वानाने कोमल यांच्या दिशेने झेप घेतली. श्वानाने पीडित महिलेच्या हात आणि पायाला, खांद्याला चावे घेतले. कोमल यांना गंभीर दुखापत केली. कोमल यांनी प्रतिकार करून श्वानाला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण आक्रमक श्वानाने कोमल यांना गंभीर जखमी केले.
हे ही वाचा… बदलापूरकरांना जलदिलासा, २६० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारची मंजुरी
कोमल यांचा ओरडा ऐकल्यावर महेश घरातून बाहेर आले. त्यांनी श्वानाला आवरले. निष्काळजीपणाने श्वानाची हाताळणी करत असल्याने कोमल यांनी महेश यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक निकिता भोईगड तपास करत आहेत.