उल्हासनगर: २०१७ वर्षात महाराष्ट्रात गाजलेल्या सुमारे दीडशे कोटींच्या ‘सागर इन्व्हेस्टमेंट’ गुंतवणूक फसवणूक प्रकरणाच्या खटल्यात गती येत नसल्याने आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी गुरूवारी उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. गेल्या सहा वर्षांत या प्रकरणात विशेष प्रगती झाली नसून सर्व आरोपी जामिनावर आरामात जगत आहेत आणि गुंतवणूकदार मात्र न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे आरोपींची संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे वेळेत परत करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रचलित व्याजापेक्षा अधिकचे व्याजदर गुंतवणुकीवर देऊन हजारो गुंतवणूकदार जोडणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीला २०१६ वर्षात घरघर लागली. गुंतवणूकदारांना व्याज वेळेत परत मिळत नसल्यामुळे अस्वस्थता वाढली. गुंतवणूकदारांचा संताप वाढल्याने सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक सुहास समुद्र यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनीता समुद्र, मुलगा श्रीराम समुद्र, भक्ती समुद्र आणि अनघा समुद्र या पाच जणांवर मे, २०१७ मध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. काही महिन्यात सर्व आरोपींना अटक झाली आणि त्यांना जामीनही मिळाला. गेल्या सहा वर्षात याप्रकरणी खटल्याला गती मिळाली नसल्याचे सांगत काही दिवसांपासून सागर इन्व्हेस्टमेंटचे गुंतवणूकदार आंदोलनाच्या पवित्रात होते.

हेही वाचा : डोंबिवली जवळ वातानुकूलित लोकलवर दगडफेक; महिला जखमी

अखेर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखालील सुमारे शंभर गुंतवणूकदारांनी एकत्र येत उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. वयोवृध्द गुंतवणूकदार, त्यांचे कुटुंब यावेळी आंदोलनात सहभागी झाले. मात्र उपविभागीय अधिकारी दुपारपर्यंत भेट देण्यास न आल्याने वयोवृध्द गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त केला.

गुंतवणूकदारांचे आरोप काय

आरोपी सुहास समुद्र यांच्या नाशिक व पुणे जिल्हयातील मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र, संबंधित खात्यांकडून अजूनही घेण्यात आलेले नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे यांच्या कडून कोणताही पाठपुरावा करण्यात आलेला नाही. ज्या मालमत्ता विवादित स्थितीत नाहीत अशा मालमत्तांच्या लिलावाची कार्यवाही सुरू करण्याबाबत अकारण विलंब होत आहे. उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर यांच्या कार्यालयाकडून काहीही पाठपुरावा करण्यात आलेला नाही.

हेही वाचा : प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी कल्याण, डोंबिवलीत पालिका विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या

या कार्यालयातील एकही सक्षम अधिकारी सुनावणीस हजर रहात नाही. सरकारी वकील, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे आणि प्रांत अधिकारी कार्यालय यांच्यात समन्वय नाही, त्यामुळे सदर प्रकरणी विलंब होत आहे, असे आरोप यावेळी गुंतवणूदारांनी केले. हजारो गुंतवणूकदार हलाखीचे जीवन जगत असतांना आरोपी समुद्र कुटुंबीय मात्र जामिनावर सुटल्याने बिनधास्त जीवन जगत आहेत. ज्यांची फसवणूक झाली ते आजाराने ग्रस्त होऊन मृत्यमुखी पडत आहेत, हा अन्याय असून यावर संवेदनशीलपणे कार्यवाही करण्याची मागणी यावेळी शैलेश वडनेरे यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ulhasnagar agitation of investors of sagar investment company outside the office of sub divisional officer css
Show comments