उल्हासनगर: उल्हासनगर जवळील आशेळे गावातील कृष्णा नगरमधून अनधिकृतपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. गेल्या दोन महिन्यात उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत आतापर्यंत २० बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केलेली आहे. त्यात आशेळे गावात सर्वाधिक कारवाई झाली असून आशेळे हे बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान बनले की काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

उल्हासनगर गुन्हे शाखेने गुरुवारी आशेळे गावातील कृष्णा नगरमध्ये एका घरात धाड टाकून अनधिकृतपणे आणि कोणत्याही वैध व्हिसाविना राहणाऱ्या शहाजान दुलाल मुल्ला या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला राहण्यासाठी आश्रय देणाऱ्या घर मालकावरसुद्धा कारवाई केली जाणार आहे. मागील दोन वर्षांपासून हा व्यक्ती विनापरवाना आशेळे गाव याठिकाणी राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाई नंतर अशा प्रकारे बेकायदेशीररित्त्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. येत्या काळात अशा बेकायदेशीरपणे बांगलादेशी घुसखोर व्यक्तींना आश्रय देणाऱ्या घर मालकांवरही कठोर कारवाई होणार आहे.

Story img Loader