कल्याण : उल्हासनगर पाचमधील नेताजी चौकातील श्रेयस दवाखान्याचे डाॅक्टर दीपक सजनानी यांच्याकडे इलेक्ट्रोपॅथीची पदवी असताना ते ॲलोपॅथीचे औषधे रुग्णांना देत आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या वैद्यकीय सेवा नोंदणीचे प्रमाणपत्र नसताना ते रूग्ण सेवा देत असल्याचे आढळून आल्याने महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, ठाण्यातील गृह विभागाचे नायब तहसीलदार यांच्या प्राप्त पत्रावरून उल्हासनगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी डाॅक्टर दीपक सजनानी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर पालिकेच्या नागरी सेवा केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. जोत्सना शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर पाचमधील नेताजी चौकातील श्रेयस दवाखान्याचे चालक डाॅ. दीपक सजनानी यांच्या विषयी काही जागरूकांनी चार वर्षापूर्वी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. डाॅ. सजनानी यांच्याकडे वैद्यकीय परिषद नोंदणीचे प्रमाणपत्र नसल्याचे, त्यांच्याकडे इलेक्ट्रोपॅथी, नॅचरोपॅथी, बाल रुग्ण सेवेची प्रमाणपत्र असताना ते ॲलोपॅथीचे औषधे रुग्णांना देत असल्याच्या तक्रारींचे स्वरूप होते.

या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर उल्हासनगर पालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. मोहिनी धर्मा यांच्या नेतृत्वाखाली डाॅ. शुभांगी देवरे, डाॅ. सत्यम गुप्ता, डाॅ. ज्योत्सना शिंदे, डाॅ. उत्कर्षा शिंदे, डाॅ. वैशाली नाईक, परिचारक सुरेंद्र पिलानी, हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साळवे हे पथक अचानक दीड महिन्यापूर्वी डाॅ. सजनानी यांच्या श्रेयस दवाखान्यात दाखल झाले. त्यावेळी डाॅ. सजनानी रुग्ण तपासत होते. डाॅ. मोहिनी धर्मा यांनी डाॅ. सजनानी यांच्याकडे वैद्यकीय शैक्षणिक अहर्तेबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे बी. ई. एम. एस. (इलेक्ट्रोपॅथी) पदवी आढळून आली. तसेच बाल रुग्ण सेवेचे प्रमाणपत्र, नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र आढळले. दवाखान्यात ॲलोपॅथी औषधे आढळून आली. सिध्दा मुग्धा प्रयोगशाळा प्रमाणपत्र, एन. ई. एच. एम.चे प्रमाणपत्र आढळले. वैद्यकीय सेवेचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना डाॅ. सजनानी रुग्ण सेवा देत असल्याचे तपास पथकाला आढळले.

घटनास्थळी सापडलेली औषधे, प्रमाणपत्रे यांचा पंचनामा करण्यात आला. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना डाॅ. सजनानी रुग्ण सेवा देत असल्याचे आणि सामान्य लोकांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने उल्हासनगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. ज्योत्सना शिंदे यांनी डाॅ. सजनानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाने गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader