रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करून माल उतरवणे, गॅरेजमधील वाहनांची रस्त्यावर दुरूस्ती करणे आणि अवजड वाहने रस्त्यावर उभी करणे अशा विविध कारणांनी वाहतुकीसाठी महत्वाचे रस्ते अडवणाऱ्यांवर उल्हासनगर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहदारीच्या रस्त्याला अडथळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उल्हासनगर शहर अत्यंत दाटीवाटीचे शहर आहे. भर रस्त्यात एखादे वाहन बंद पडले की उल्हासनगर शहरातील वाहतुक व्यवस्था कोलमडते. त्यानंतरही अनेक जण या वाहतुक कोंडीत भर घालतात. उल्हासनगर शहरातील कल्याण बदलापूर राज्यमार्गावर शांतीनगर भागात असलेल्या चारचाकी वाहन वाहन विक्री दुकानांपासून रस्ता अडवण्याचे प्रकार सुरू झालेले दिसतात. पुढे गॅरेज, दुकानदारांची वाहने अशामुळे रस्त्यात अडथळे निर्माण होतात. अंतर्गत रस्त्यांवरही हीच परिस्थिती आहे. अनेकदा गोदामांमध्ये आलेली वाहने रस्त्यात उभी केली जातात. अनेक गॅरेज मालक दुरूस्तीसाठी आलेली वाहने भर रस्त्यात उभी करून दुरूस्त करतात. याच कल्याण बदलापूर राज्यमार्गावर चारचाकी सजावटीची दुकाने आहेत. ही सजावटही भर रस्त्यातच केली जाते. त्याचा इतर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशाच काही रस्ते अडवणाऱ्यांवर बुधवारी मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली.
कॅम्प तीन भागात अंबिका नगर येथे भररस्त्यात वाहन उभे करून माल उतरवणाऱ्या आनंद चव्हाण, सेक्शन १७ येथे क्रेन वाहन भर रस्त्यात उभे करून वाहतुकीस अडचण निर्माण करणारा संतोष गुप्ता, गॅरेजमध्ये दुरूस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यावर आणून दुरूस्ती करणारा प्रविण गुप्ता आणि वसंत बहार इमारतीसमोर पॉपुलर गॅरेजमधील ज्वाला कहर या चौघांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सातत्याने करण्याची मागणी आता होते आहे.