उल्हासनगर : धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न उल्हासनगर शहरात कायम आहे. या इमारतींमधून बेघर झालेल्या नागरिकांना पुनर्स्थापित करण्यासाठी शहरात संक्रमण शिबिर उभारण्याची मागणी होत होती. अखेर संक्रमण शिबिराच्या उभारणीसाठी आवश्यक निधी मिळाला असून लवकरच या शिबिराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. शासनाने उल्हासनगर शहरासाठी २३ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
उल्हासनगर शहर विस्थापितांचे शहर म्हणून परिचित आहे. वाढती लोकसंख्या आणि अपुरी जागा यामुळे अत्यंत दाटीवाटीने शहरात इमारती उभ्या राहिल्या. त्यातील अनेक इमारती विनापरवाना उभ्या राहिल्या. या विनापरवाना इमारतींवर कारवाई करत असताना पालिका प्रशासनाने त्या त्या वेळी या इमारतींचे स्लॅब तोडले. मात्र काही कालांतराने इमारतींच्या बांधकाम व्यावसायिकांनी ते पुन्हा जोडून इमारती वापरात आणल्या. तसेच शहरात नव्वदीच्या काळात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून इमारती उभ्या केल्या गेल्या. या इमारती कोसळण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले. इमारत कोसळल्यानंतर इमारतीतील रहिवाशांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर येत होता.
हेही वाचा : ऐन दिवाळीत डोंबिवली वाहतूक कोंडीच्या विळख्यात, डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते काँक्रिटीकरणासाठी खोदले
अशा रहिवाशांसाठी पालिकेतर्फे पर्यायी व्यवस्था असावी, धोकादायक, निर्माणाधीन इमारतीतील रहिवाशांना पर्यायी व्यवस्था असावी, त्यासाठी संक्रमण शिबीराची उभारणी करावी अशी मागणी सातत्याने होत होती. सोबतच शहरात एखादी आपत्ती आल्यास पालिकेची स्वतःची व्यवस्था असावी अशीही मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी केली होती. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत शासनाकडे यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून २३ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षीत संक्रमण शिबीराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या केंद्राच्या उभारणीला सुरूवात केली जाणार आहे. या केंद्राच्या उभारणीनंतर उल्हासनगर तसेच आसपासच्या काही शहरांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच, आपत्तीच्या वेळी अडचणीत सापडलेल्या गरजूना तात्पुरत्या स्वरूपात एक हक्काचा आणि सुरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावर फटाक्यांचे स्टाॅल लावण्यात शिवसेना-भाजप आघाडीवर
महापूर, भूस्खलन, भूकंप, इमारत दुर्घटना, आग लागणे यांसारख्या आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने आणि तत्परतेने काम करत असतात. अशा दुर्घटनांच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचवत असतात. मात्र नागरिकांना नैसर्गिक अथवा अनैसर्गिक आपत्तींमधून बाहेर काढल्यानंतर या नागरिकांच्या कायमच्या निवाऱ्याची सोय होईपर्यंत या सर्वांना तात्पुरत्या मात्र सुरक्षित निवाऱ्याची गरज असते. अशा वेळी विविध सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करण्यात येते.