उल्हासनगरः ताटातली शेवई खाण्यास न दिल्याचा राग आल्याने एका सराईत गुन्हेगाराने चक्क घर मालकावर चाकुने सपासप वार करून हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी इक्रार उर्फ कल्लन याला अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

इक्रार उर्फ कल्लन असे आरोपीचे नाव असून, तो पूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. सराईत असलेला हा गुन्हेगार शनिवारी अचानक उल्हासनगर कॅम्प पा भागातील अफसार यांच्या घरात शिरला. त्यावेळी त्याने घरात असलेल्या शेख यांच्याकडे ‘मला खायला शेवई दे’ अशी मागणी केली. अचानक एक व्यक्ती घरात शिरून शेवईची मागणी करत असल्याने अफसार शेख आणि त्यांचे कुटुंबीय चक्रावले. त्यामुळे अफसार शेख यांनी त्याला शांतपणे घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र त्या गोष्टीचा आरोपीला राग आला. त्यामुळे ईरोपी इक्रारने अफसार यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

अचानक झालेल्या मारहाणीमुळे गोंधळलेल्या अफसार यांनी त्याला प्रतिकार करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी अफसार यांनी आरोपीला पकडून ठेवले. त्याचवेळी त्यांनी घरात असलेली पत्नी आणि मुलीला पोलीसांना पाचारण करण्याचे सांगितले. त्यामुळे त्या दोघी घरातून बाहेर आल्या. या दरम्यान इक्रारने आपल्या खिशातून चाकू काढला. संधी मिळताच त्याने अफसार शेख यांच्यावर सपासप वार केले. वार केल्यानंतर इक्रार घटनास्थळावरून पळून गेला. यावेळी अफसार शेख गंभीर जखमी झाले होेते. मात्र अशा अवस्थेत असूनही अफसार शेख यांनी मोठ्या धैर्याने हिललाईन पोलिस ठाण्यात जाऊन स्वतः तक्रार दाखल केली. हिललाईन पोलिसांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेत गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. त्यामुळे अवघ्या २४ तासांत आरोपी इक्रारला हिललाईन पोलिसांनी अटक केली. तर जखमी अफसार शेख यांच्यावर सध्या कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. हा आरोपी सराईत असून त्याच्यावर अशा प्रकारचे काही गुन्हेही दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यातील काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या हल्ल्यानंतर अफसार शेख आणि त्यांचे कुटुंबीय भितीच्या छायेत आहेत. अचानक चालेल्या या हल्ल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.