उल्हासनगर: सध्या सर्वत्र जाहिरातींचा मोठा मारा सुरू आहे. पण जे अस्सल असतात त्यांना जाहिराती करण्याची गरज नसते, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘केलंय काम भारी’ या शिवसेना शिंदे गटाच्या प्रचार मोहिमेवर जोरदार हल्लाबोल केला. अंधारे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्यावरही टीका केली. ज्यांच्या आशीर्वादाने किणीकर मोठे झाले त्यांनाच दाबण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप अंधारे यांनी यावेळी बोलताना केला.
शिवसेना ठाकरे गटाचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी शनिवारी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. या सभेसाठी उल्हासनगर शहरात येणाऱ्या सुषमा अंधारे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी चक्क दुचाकीवरून प्रवास करत सभास्थळ गाठले. अंधारे यांनी आपल्या भाषणात स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बालाजी किणीकर यांच्यासह शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. अंबरनाथ विधानसभेत ‘केलंय काम भारी’ या जाहिरातींवर अंधारे यांनी टीका केली. मी प्रवासात लोकांना विचारलं की या आमदाराने काय भारी काम केलंय तर लोक म्हणाली हे गुवाहाटीला पळून गेले हेच यांचं भारी काम आहे. तर दुसऱ्या महिलेने बदलापूर अत्याचार प्रकरणातील आंदोलकांवर लाठी हल्ला करण्याचा आदेश देण्याचं भारी काम यांनी केलंय, अशी टीका यावेळी अंधारे यांनी केली. ज्या वाळेकरांच्या आशीर्वादाने किणीकर आमदार झाले, त्यांनाच त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला असे सांगत अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटातील गटबाजीवरही बोट ठेवले. असा कोणता अलादीनचा दिवा घासला की किणीकर यांच्याकडे एवढी संपत्ती आली. जो माणूस एक दवाखाना चालवत होता तो एवढा श्रीमंत कसा होतो, असा प्रश्न विचारत अंधारे यांनी किणीकरांच्या संपत्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांच्यावर आरोप केले.
हेही वाचा : “चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
राज्यात सध्या सर्वत्र जाहिरातींचा मोठा रतीब सुरू आहे. मात्र जे अस्सल असतात त्यांना जाहिरात करण्याची गरज येत नाही, अशी टीका अंधारे यांनी यावेळी केली. आज लाडकी बहीण योजनेच्या नावाने प्रचार केला जात होता. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री बनल्यापासून दोन वर्ष शिंदेंना लाडक्या बहिणीची आठवण आली नाही. पण लोकसभेत बहिणींनी इंगा दाखवल्यावर यांनी योजना सुरू केली, असा आरोपही अंधारे यांनी यावेळी केला. कोणता भाऊ आपल्या बहिणीला पैसे दिल्यावर त्याची जाहिरात करतो असा प्रश्नही अंधार यांनी उपस्थित केला. लाडक्या बहिणी योजनेवरून मते मिळत नाहीत असं कळल्यानंतर पुन्हा राज्यात धर्माधर्मांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा जो प्रचार केला जातो आहे. तो यातूनच केला जातो आहे, असा आरोपही अंधारे यांनी यावेळी बोलताना केला.