कल्याण : स्वसंरक्षणासाठी शासन परवानगीने मिळालेले रिव्हाॅल्व्हर सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने मिरविण्यास प्रतिबंध आहे. फक्त स्वसंरक्षणासाठीच या रिव्हाॅल्व्हरचा धारकाने वापर करायचा आहे. हे शस्त्र परवानाविषयक नियम असताना कल्याणमधील उंबर्डे गावात शुक्रवारी रात्री एक व्यक्ति जवळील रिव्हाॅल्व्हर काढून व्यासपीठावर गर्दीत हातात फिरवत, रिव्हाॅल्व्हरचे प्रदर्शन करत हळदी समारंभात नाचत असल्याची दृश्यध्वनीचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

यापूर्वी अशाप्रकारे लग्न, वाढदिवस, हळदी समारंभ, मिरवणुकीत सार्वजनिक ठिकाणी बंदुक, रिव्हाॅल्व्हर, तलवार घेऊन नाचणाऱ्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी तलवारीने केक कापण्याचे प्रकार वाढले होते. परंतु, पोलिसांनी अशा व्यक्तिंविरुध्द शस्त्र प्रतिबंध कायद्याने गुन्हे दाखल केल्याने कल्याण, डोंबिवली परिसरात मागील दोन वर्षापासून हे प्रकार थांबले होते.

ही सर्व माहिती असुनही उंबर्डे येथील हळदी समारंभात शुक्रवारी एक व्यक्तिने आपल्या कंबरेला खोचलेले स्वसंरक्षणासाठीचे रिव्हाॅल्व्हर काढून ‘अरे दिवानो मुझे पेहचानो मै हु डाॅन’ या हिंदी गाण्यावर नृत्य केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

चिंतामण लोखंडे असे सोन्याने सर्वांग मढून व्यासपीठावर नाचणाऱ्या व्यक्तिचे नाव आहे. व्यासपीठावर व्हराडी मंडळी नाचत होती. यामध्ये लहान बालके, महिला यांचाही सहभाग होता. यावेळी चिंतामण लोखंडे हेही व्यासपीठावर नाचत असताना अचानक त्यांनी उजव्या कमरेला खोचलेले स्वसंरक्षणासाठीचे रिव्हाॅल्व्हर बाहेर काढले. ते डाव्या हातात गरगर फिरवत, आपल्या शस्त्राचे प्रदर्शन करत नाचू लागले. या नृत्याची उपस्थितांमधील काहींंनी दृश्यध्वनीचित्रफित तयार केली. ती समाज माध्यमांवर प्रसारित केली. रिव्हाॅल्व्हार घेऊन नाचत असताना काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस याप्रकरणाची कशी दखल घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
शस्त्र परवाना नियमाचे उल्लंघन केल्याने संबंधितावर कारवाई करण्याची मागणी जाणकार नागरिकांकडून करण्यात येत आहे. कल्याण, उल्हासनगरमध्ये एकूण १९ परवानाधारी रिव्हाॅल्व्हरधारक आहेत. आठ जणांनी नव्याने रिव्हाॅल्व्हसाठी गृह विभागाकडे अर्ज दाखल केले असल्याचे समजते.

Story img Loader