ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका घरामध्ये सुमारे ९० गोण्या भरून गुटखा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर त्याच्या दुसऱ्या साथिदाराचा पोलीस शोध घेत आहेत. घरामधूनच वागळे इस्टेट भागातील टपऱ्यांवर या गुटख्याचा साठा पुरविला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वागळे इस्टेट येथील आंबेवाडी परिसरात एका घरामध्ये मोठ्याप्रमाणात गुटख्याचा साठा साठविला जात असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वागळे इस्टेट पोलिसांच्या पथकाने मदिना मशीदीजवळील एका घरामध्ये पोलिसांनी छापा मारला. त्यावेळी घरामध्ये एकजण आढळून आला. पोलिसांनी घरामध्ये जाऊन पाहाणी केली असता, तेथे पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये गुटख्याची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी घरामधील व्यक्तीला हा गुटखा कोणाचा आहे ? कोणाला विक्री करणार होते ? असे विचारले असता, त्याने हा साठा त्याच्या साथिदाराचा असल्याचे सांगितले. तसेच तो साथिदाराच्या मदतीने वागळे इस्टेट भागातील पान टपऱ्यांवर या गुटख्याची विक्री करत असल्याचे समोर आले. या घरातून पोलिसांनी ८६ गोण्यांमधून तब्बल २ लाख २१ हजार ८६५ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम १२३, २७५, २२३, ३ (५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (१), कलम २६ (२) (४), कलम २७ (२) (ई), कलम २७ ( ३) (ड), कलम २७ (३) (ई), कलम ३० (२) (अ), कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर दुसऱ्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे अशी माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.

या कारवाईमुळे शहरात गुटख्याची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. शहरातील टपऱ्यांवर मोठ्याप्रमाणात गुटख्याची विक्री होत असते. अनेकदा या टपऱ्यांवर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या टपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील अनेकदा पुढे आली होती. शहरातील या टपऱ्यांवर अनेकदा गुटख्याचा साठा आढळून आला होता.

Story img Loader