कल्याण, टिटवाळा परिसरात एकूण सहा ते सात टपाल कार्यालये आहेत. या टपाल कार्यालयांमध्ये टिळक चौक, कल्याण वितरण केंद्र, सिंडीगेट येथील सुभाष रस्त्यावरील कार्यालय, काटेमानिवली व मांडा कार्यालयांचा समावेश आहे. कल्याण शहराची चाळीस वर्षांपूर्वीची भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध लोकसंख्येनुसार या टपाल कार्यालयांची रचना करण्यात आली होती. त्या परिस्थितीत आता जमीन-अस्मानाचा फरक पडूनही अद्याप टपाल कार्यालयातून त्याच अपुऱ्या व्यवस्थेतून बटवडा (पत्र) वाटप करण्याचे काम वर्षांनुवर्ष सुरू आहे.
तीस ते चाळीस वर्षांपूर्वी कल्याण परिसराची लोकसंख्या तीन ते चार लाख होती. गेल्या दहा वर्षांत कल्याण शहर परिसराचे झपाटय़ाने नागरीकरण झाले. घरांची वाढती गरज ओळखून वाऱ्याच्या वेगाप्रमाणे गृहसंकुले वाढत आहेत. कल्याण पूर्व, पश्चिमेचा पडिक, दलदलीचा असलेला भाग भव्य गृहसंकुलांनी व्यापला आहे. पश्चिमेतील आधारवाडी ते गंधारे, बारावे पट्टा नवीन कल्याण शहर म्हणून ओळखला जात आहे. आजघडीला कल्याण परिसराची लोकसंख्या सहा ते सात लाख झाली आहे. या वाढत्या लोकवस्तीला उपलब्ध टपाल कार्यालये अपुरी आणि येण्या-जाण्याच्या दृष्टीने गैरसोयीची आहेत. खासगी वितरण सेवा वाढल्या असल्या तरी रजिस्टर, मनीऑर्डर, टपाल तिकिटे तसेच महत्त्वाचे टपाल पाठविण्यासाठी आजही सर्वसामान्य, मध्यमवर्गीय, उद्योजक, व्यावसायिक, विविध आस्थापना टपाल कार्यालयांचा वापर करतात.
गंजलेली सामग्री
कार्यालयात येणाऱ्या ग्राहक, एजंटला बसण्यासाठी जागा नाही. लिखापडी करण्यासाठी टेबल नाही. पाकीट गोंदाने चिकटवायचे असले तरी तेथे साधी गोंदाची डबी नाही. असलीच तर ती बाबा आदम जमान्यातील आणि त्यात गोंद काढण्यासाठी खराटय़ाची काडी टाकलेली. लिखापडी करण्यासाठी काही ठिकाणी फडताळ केले आहेत, मात्र ते तुटून ग्राहकाच्या पायावर पडू नये म्हणून तेथील फळीचे एक टोक सुतळीने कोठे तरी बांधून ठेवलेले आहे, अशी गचाळ अवस्था टपाल कार्यालयांची झाली आहे. कर्मचारी काम करीत असलेल्या काही जागा इतक्या कोपऱ्यात की वीजपुरवठा बंद झाला की तेथे चक्क दिवाबत्ती लावून काम करावे लागते. कर्मचाऱ्यांसाठीच पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहासाठी चांगली सुविधा नाही. तिथे या सुविधा ग्राहकांना मिळणे दुर्मीळच. स्थानिक टपाल कार्यालयांनी वरिष्ठांकडे कार्यालय दुरुस्तीसाठी अनेक वेळा प्रस्ताव पाठविले आहेत, पण त्याकडे कधी कुणी ढुंकूनही पाहात नाही. त्यामुळे टपाल कार्यालयांमधील बाबू कारभार ग्राहकांशी वादावादी करीत वर्षांनुवर्षे सुरू आहे.
नवीन परिसर दुर्लक्षित
कल्याण, टिटवाळा परिसरात नवीन लोकवस्ती वाढली आहे. आधारवाडी, गंधारे, बारावे, विजयनगर, आमराई, चिंचपाडा, नेतिवली, तिसवली परिसर नव्याने विकसित होत आहे. या भागात नवीन टपाल कार्यालयांची गरज आहे. या भागातील रहिवाशांना फेरा घेत जुन्या टपाल कार्यालयांमध्ये यावे लागते. नवीन भागातील रहिवाशांना जुन्या टपाल कार्यालयात रिक्षेने यायचे म्हणजे शंभर ते दीडशे रुपये खिशात भाडय़ासाठी तयार ठेवावे लागतात. त्यामुळे अनेकदा नको ती टपाल कार्यालये असा त्रागा ग्राहकांकडून व्यक्त केला जातो. येत्या काळात टपाल कार्यालयांना बँकांचा चेहरा देण्याचा मोदी सरकारचा आराखडा आहे. पण जोपर्यंत टपाल कार्यालयांमधील व वरील चढलेला गंज आणि साचलेले धुळीचे थर टपाल विभागाकडून काढले जात नाहीत, तोपर्यंत टपाल कार्यालयांना बँक म्हणवून घेण्यास ग्राहक तयार होणार नाही. तसेच नवीन वस्तीचा विचार करून विभागाने नवीन भागात टपाल कार्यालये सुरू करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा
टपाल विभागातील मुख्य कर्मचारी म्हणजे पोस्टमन. अनेक वर्षे पोस्टमनची भरती न केल्याने पोस्टमनच्या शेकडो जागा रिक्त आहेत. निवृत्त झालेल्या पोस्टमनच्या जागेवर नवीन पोस्टमन भरला जात नाही. त्यामुळे वाढती लोकवस्ती, वाढता भौगोलिक भाग, निवृत्त कर्मचाऱ्यांचा भार अशा अपुऱ्या पोस्टमनवर आहे. पोस्टमनच्या तात्पुरत्या जागा भरून गाडा पुढे ढकलला जात आहे. कार्यालयातील अनेक खिडक्यांवर कर्मचारी नसल्याने ग्राहकांची गैरसोय होते. सध्या टपाल कार्यालयांचे संगणकीकरण, ऑनलाइन पद्धतीने सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण हे प्रयत्न म्हणजे फक्त संगणकीय जुळवाजुळव आणि ऑनलाइन सेवेचा डांगोरा पिटण्यासाठी चाललेला राजकीय खेळ आहे. प्रत्यक्षात ग्राहकांना पूर्ण क्षमतेने ग्राहक सेवा देण्यात टपाल कार्यालये आता असमर्थ ठरू लागली आहेत.
धुळींनी भरलेली दप्तरे
जुन्या टपाल कार्यालयांची गेली कित्येक वर्षे कोणतीही डागडुजी करण्यात आली नसल्याने, कल्याणमधील सर्वच टपाल कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. स्थानिक टपाल व्यवस्थापनाला नूतनीकरण, देखभाल दुरुस्तीचे अधिकार नसल्याने वरिष्ठांचा आदेश असल्याशिवाय स्थानिकांना कार्यालय नूतनीकरणाचे काम करता येत नाही. वर्षांनुवर्षे कल्याणमधील टपाल कार्यालयांची डागडुजी न झाल्याने टपाल कार्यालयांना गंज चढला आहे. कार्यालयातील काळीकुट्ट टेबल्स, खुच्र्या, धुळीने भरलेली दप्तरे, आटोपशीर जागेत दाटीवाटीने बसलेले कर्मचारी आणि त्यात ग्राहक, एजंटांची वाढती वर्दळ. यामध्ये टपाल कार्यालयांची घुसमट होत आहे. यापूर्वीच्या जागा आटोपशीर होत्या. ग्राहकांची संख्या कमी होती. आता ग्राहक वाढले आहेत. बटवडा, कार्यालयातील कागदपत्र वाढले आहेत. गुंतवणूक योजना वाढल्या, त्या प्रमाणात एजंट वाढले, ग्राहकही वाढले. या सर्वाचा वाढता भार जुन्या आटोपशीर टपाल कार्यालयांवर येऊन पडला आहे.