डोंबिवली: राज्याच्या विविध भागात विखुरलेल्या, तसेच ठाणे, रायगड, मुंबई जिल्ह्यातील आगरी समाजाचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले सामाजिक, विकासाभिमुख प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे तसेच, या समाजाला न्याय देण्याचे महत्वपूर्ण काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केले.
आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीत १८ व्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आगरी समाजाचे नेते जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील, रामशेठ ठाकूर, आ. गणपत गायकवाड, फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, शरद पाटील, अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचा एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता.
ठाणे, रायगड जिल्ह्यात आगरी समाज मोठ्या संख्येने आहे. या जिल्ह्यातील विकास कामे, प्रकल्पांमध्ये या समाजाने भूमीच्या माध्यमातून मोठे योगदान दिले आहे. या समाजाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होते. नवी मुंबईत विमानतळ प्रस्तावित होताच, येथील शेतकऱ्यांना साडे बावीस टक्के लाभ आणि अन्य सुविधा देण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवी मुंबई क्षेत्रात शेतकरी नेते दि. बा. पाटील यांचे अतुलनीय काम आहे. या भागातील विमानतळाला त्यांचेच नाव देणे योग्य होते. तरीही काही मंडळींनी कद्रु मन केले. नाहक नामकरणावरुन संघर्ष निर्माण केला. मोठे मन केले असते तर नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा विषय चिघळला नसता, असे बोलून मंत्री चव्हाण यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या समाजावर अन्याय होणार नाही अशा पध्दतीने धाडसी आणि धोरणात्मक निर्णय घेतले. या निर्णयात थोडी चूक झाली असती तर ओबीसी समाजातील मुलांना नोकऱ्यांमध्ये, लोकप्रतिनिधींना महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष सारख्या पदापासून दूर राहावे लागले असते. हे सगळे जोखड आता दूर करण्यात आले आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. समाज, शिक्षण क्षेत्रात आगरी युथ फोरम उल्लेखनीय काम करत आहे. आगरी महोत्सवाच्या माध्यमातून विविध प्रकारचा समाज घटक एकत्र येऊन समाज संघटनाचे मोठे काम आगरी फोरम करत आहे. हे करत असताना आता आगरी युथ फोरमने समाजातील प्रत्येक घटकाची आर्थिक उन्नत्ती होण्याच्या दृष्टीने व्यवसाय, उद्योग, व्यापाराच्या माध्यमातून काही प्रयत्न करता येतील का यादृष्टीने हालचाली सुरू कराव्यात. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
आगरी महोत्सव
आगरी महोत्सव डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात १२ ते १९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. विविध प्रकारचे १२५ मंच महोत्सवात आहेत.