ठाणे : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले असून या सत्तांतराचे केंद्रबिंदू असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. माजिवडा परिसरातील रुस्तमजी गृहसंकुलामधील टाऊन सेंटरच्या जागेवर उभारण्यात आलेले ग्लोबल करोना रुग्णालय बंद केल्यानंतर त्याठिकाणी कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार असून या रुग्णालय उभारणीच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १६ ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याची माहिती राजकीय सुत्रांनी दिली. यानिमित्ताने ठाणे जिल्ह्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा <<< भातसा धरणाचे सर्व दरवाजे १.२५ मीटरने उघडले; धरणातून ६५० क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरु
रुस्तमजी गृहसंकुलातील हा भूखंड ठाणे महापालिकेस ‘टाऊन सेंटर’ या आरक्षणाच्या विकासातून प्राप्त झाली आहे. तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात ही जागा खासगी उद्योगांना भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ठाणे महापालिकेने करोना काळात या ठिकाणी सुसज्ज असे रुग्णालय उभारले आणि त्यानंतर खासगी उद्योगांना जागा भाडेपट्ट्यावर देण्याचा प्रस्ताव मागे पडला. यानंतर या जागेत कर्करोग रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव पुढे आला. टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने येथे अद्ययावत कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार असून या प्रस्तावास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. असे असले तरी इतकी मोठी जागा विनाशुल्क हस्तांतरित करण्यात कायदेशीर अडचणी होत्या. महापालिका प्रांतिक अधिनियमातील तरतुदीनुसार चालू बाजार किमतीपेक्षा महापालिकेला मिळणारा मोबदला कमी असता कामा नये अशी महत्त्वाची अट आहे. त्यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला होता. या प्रस्तावास वर्षभरापुर्वी नगरविकास विभागाने मान्यता दिली होती. त्यावेळेस हा विभाग मुख्यमंत्री शिंदे यांच्या अखत्यारित होता. वर्षाला एक रुपया इतके भाडेपट्टा शुल्क आकारून हा भूखंड ३० वर्षांसाठी हस्तांतरित करण्यास मान्यता देत या दोन संस्थांसोबत महापालिकेच्या त्रिपक्षीय करारासदेखील विभागाने मंजुरी दिली होती. त्यानुसार संबंधित संस्थांनी महापालिकेसोबत हा करार करत रुग्णालय उभारणीच्या कामाची तयारी सुरु केली असून या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी जितो संस्थेने पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले आहे. पंतप्रधान कार्यालयाने अद्याप त्याबाबत कळविलेले नसले तरी या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हे येणार असल्याचे राजकीय सुत्रांकडून समजते.
ठाण्यातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून यामुळे याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. हि बाब लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्करोग रुग्णालय उभारणीच्या जागेच्या परिसराची पाहाणी केल्याचे सुत्रांनी सांगितले.