भाईंदर : मीरा भाईंदर वसई विरार शहरात घडत असलेल्या सायबर गुन्ह्यांवर तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून विशेष अशा सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. शनिवारी या पोलीस ठाण्याचे ऑनलाईन उद्घाटन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१ ऑक्टोबर २०२० रोजी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालायची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाचे कामकाज पार पाडले जात असतानाच त्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे अशा गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जानेवारी २०२१ साली आयुक्तालयाकडून सायबर विभागाची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार मागील अडीच वर्षांपासून तपास करत असताना सायबर विभागाला चांगले यश मिळू लागले आहे. तर यातील बऱ्याच तपासाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे सायबर विभागाच्या कामाला बळकटी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्याकडून घेण्यात आला आहे.

हेही वाचा – खासदार अशोक नेतेंच्या वाहनाला भीषण अपघात, सीटबेल्ट व एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले!

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर, दरे गावाला भेट

१६ जानेवारी २०१६ साली सायबर विभागाला पोलीस ठाण्याचा दर्जा देत असल्याचा आदेश गृह विभागाकडून देण्यात आला आहे. याच आदेशाचा आधार घेत पोलीस आयुक्तालयाने २ जानेवारी २०२३ रोजी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास शासनाने नुकतीस मंजुरी दिली होती. त्यामुळे आता सायबर पोलीस ठाण्यास एसओपी दर्जा प्रधान करून पुढील कामाची पद्धत निश्चित केली जाणार आहे. तर प्रामुख्याने सायबर गुन्ह्याची नोंद ही स्थानिक पोलीस ठाण्यातच होणार असून सायबर पोलीस ठाण्यात गंभीर तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या गुन्ह्याची जबाबदारी असणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of cyber police station of meera bhayander vasai virar police commissionerate ssb