दोन्ही पुलांचे रविवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे : ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन खाडी पुलावरील एक मार्गिका तसेच मुंब्रा वाय जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पणास अखेर मुहूर्त मिळाला असून या दोन्ही पुलांचे लोकार्पण येत्या रविववारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल आहेत. त्यापैकी जुना झालेला ब्रिटिशकालीन खाडीपूल काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या खाडी पुलावरून सद्य:स्थितीत वाहतूक सुरू आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडू लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने तिसरा खाडी पूल उभारणीचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आले आहे. विटावा ते ठाणे पोलिस मुखालय अशा एका मार्गिकेचे काम पुर्ण झाले असून ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तशाप्रकारची मागणी केली होती. नवरात्रौत्सवाच्या काळात ही मार्गिका खुली करण्याची तयारी सुरु झाली होती. मात्र, तोही मुहूर्त टळला.
हेही वाचा >>> मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत रविवारी किलबिल महोत्सव
त्यामुळेही मार्गिका केव्हा खुली होणार अशी विचारणा नागरिकांकडून केली जात असतानाच, ही मार्गिका खुली करण्यासाठी अखेर येत्या रविवारचा मुहूर्त सापडला आहे. या दोन्ही पुलांचे लोकार्पण येत्या रविववारी दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांमुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची चिन्हे आहेत. या मार्गिकेमुळे ठाणे आणि कळवा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले असून या पुलाचे लोकार्पण करण्याचीही मागणी होत होती. या पुलाचेही लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार असून यामुळे मुंब्रा वाय जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> ठाणे: शिंदे गटाला आणखी एक धक्का; माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी शिवबंधनात
असा आहे कळवा खाडी पुल
नवीन खाडी पुलाची लांबी ३०० मीटरची आहे. या पुलावर कोर्ट नाक्याहून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी मार्गिका उभारण्यात येत आहे. तसेच साकेतकडून येणाऱ्या वाहनांसाठी वर्तुळाकार मार्गिका उभारण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यात येत आहे. पादचाऱ्यांकरिता स्वतंत्र मार्गिका असणार आहे. त्याचबरोबर विद्युतीकरण आणि सुशोभीकरण अशी कामे करण्यात येत असून असे एकूण २.४० किमी पुलाचे बांधकाम आहे. त्यापैकी क्रिकनाका (पोलिस मुख्यालय) येथून बेलापूर (विटावा) कडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम पुर्ण झाले असून ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली होणार आहे.