ठाणे: आयोध्यातील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या सोहळ्याचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. या सोहळ्यानिमित्त अनेक संस्था आणि कुटूंबांकडून दिपोत्सव साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर आता पुन्हा कंदिलाच्या मागणी वाढ झाल्याचे चित्र आहे. आयोध्यातील राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्त बाजारात राम, हनुमान, मंदिर याचे छायाचित्र असलेले कंदिल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या कंदिलांना नागरिकांकडून मोठी मागणी असल्याचे ठाण्यातील कंदिल विक्रेत्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्येत २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे राम मंदिराचे उद्घाटन आणि मुर्तीची प्रतिष्ठापना निमित्ताने देशभरात रामाचा जागर सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक संस्था आणि कुटूंबांकडून दिपोत्सव साजरा करण्याची तयारी सुरु आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील बाजारपेठाही बहरलेल्या दिसून येत आहेत.

हेही वाचा… कळव्यात भगव्या पताका आणि आव्हाड समर्थकांकडून रामाचा नारा!

रामाचे टी-शर्ट, साड्या तसेच विविध वस्तूंसह दिपोत्सव साजरा करण्यासाठी बाजारात कंदील दाखल झाल्याचे चित्र आहे. अनेक संस्था, गृहसंकुले तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून कंदिल खरेदीसाठी मोठी मागणी आहे. राम, हनुमान, सीता तसेच मंदिर असे छायाचित्र असलेले पर्यावरण पूरक कंदिल आहेत. २५० ते ३५० रपये दराने प्रति कंदिल ची विक्री करण्यात येत आहे. गेले २० ते २५ दिवसांपासून या कंदिलाची मागणी वाढली आहे. मागणी नुसार हे कंदिर तयार करण्यात येत असल्याची माहिती कंदिल विक्रेत्यांनी दिली. दिवाळीनंतर पुन्हा एकदा आयोध्यातील राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने कंदिलाच्या बाजारपेठेला बहर आला असल्याची प्रतिक्रिया कंदिल विक्रेते मधुसूदन डोईफोडे यांनी दिली. राजकीय पक्ष, संस्थेतील सदस्य आणि काही गृहसंकुलांकडून या कंदिलाचे संच खरेदी केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुठ्ठा, धागा आणि कागदाचा वापर करुन हे कंदिल तयार केले जात आहेत. गेले २० ते २५ दिवसांत १२०० ते १५०० कंदिलांची विक्री झाली असून मागील दोन दिवसांपासून या कंदिलांच्या मागणीत वाढ झाली आहे.

पणत्यांचीही मागणी वाढली

आयोध्यातील राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी दिपोत्सव साजरा करण्याचे आवाहन अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यानिमित्त बाजारात कंदिलांसह पणत्यांच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. ठाण्यातील जांभळी नाका बाजारपेठेतील मातीची भांडी विक्रेत्यांकडे मागील पाच ते सहा दिवसांपासून पणत्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of the ram temple in ayodhya on this occasion many organizations and families have started preparations to celebrate dipotsav in thane dvr