महाराष्ट्रातील नाट्य परंपरेला पावणे दोनशे वर्षाचा इतिहास आहे. येथली नाट्य संस्कृती खोलवर रुजलेली आहे. आताच्या झपाट्याने बदलणाऱ्या समाज माध्यमी वातावरणात विविध तंत्रस्नेही साधने उपलब्ध असली तरी मराठी नाटकांवर आणि त्यांच्या रसिका प्रेक्षकांवर कोणताही परिणाम होणार नाही. हा प्रेक्षक याऊलट दिवसेंदिवस वाढतच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी शनिवारी येथे केले.डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील गेल्या वर्षापासून बंद असलेल्या नवीन नाटकांच्या तिकीट खिडकी केंद्राचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी अभिनेते प्रशांत दामले, कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सावित्रीबाई फुले नाट्यमंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा, साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
हेही वाचा >>>परराज्यातून आलेला ४३ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे पथकाची भिवंडीत कारवाई
नाटक म्हटले की अनेक अडचणी येतात. महापूर, अपघात असे प्रसंग येतात. करोना महासाथीत दोन वर्ष नाटके बंद होती. नाट्यसंस्था, कलाकारांना त्याचा फटका बसला. तरीही मराठी नाटकांपासून नाट्य प्रेक्षकांनी नाळ तुटलेली नाही. याऊलट ती घट्ट होत आहे. यापूर्वी दूरचित्रवाणी आली त्यावेळी मराठी नाटकांचे काय होणार म्हणून चर्चा होती.आता समाज माध्यमी अनेक तंत्रस्नेही साधने आली आहेत. त्याचा कोणताही परिणाम मराठी नाटक, प्रेक्षकांवर झालेला नाही, होणारही नाही, असे अभिनेते दामले म्हणाले.मराठी नाट्य परंपरेला पावणे दोनशे वर्षाचा इतिहास आहे. नाट्य संस्कृती महाराष्ट्रात खोलवर रुजली आहे. त्यामुळे मराठी नाटके येतच राहतील आणि त्यांचा प्रेक्षकही वाढतच राहणार आहे, असे दामले यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी अलका मुतालिक यांची निवड
मराठी नाटकांना सुगीचे दिवस यायला थोडा वेळ लागेल. पण नाटके जेथे होतात त्या नाट्यमंदिरांमध्ये प्रशासनाने चांगल्या दर्जेदार सुविधा दिल्या तर नक्कीच प्रेक्षक तिकडे वळतो. नाट्यगृहांपर्यंत प्रेक्षक आणणे हे नाट्य संस्था, कलाकारांचे काम आहे. तेथे सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा देणे हे पालिकेचे काम आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदिर, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिर चांगली आहेत. पण तेथे आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे, असे दामले यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवलीत फडके रोडवरुन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी स्वारांनी लांबवले
डोंबिवलीत दर्दी नाट्य रसिक आहे. त्यांना प्रत्येक वेळी सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे जाऊन नाट्य तिकीट खरेदी करणे शक्य नव्हते. त्यामुळे पालिकेने रेल्वे स्थानका जवळ नाटकांची तिकीट खरेदीसाठी लोकांना सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. प्रेक्षकांनी नियमित तिकिटे खरेदी करुन अधिकाधिक नाटके पाहावीत असे आवाहन दामले यांनी केले. डोंबिवली रेल्वे स्थानक ते सावित्रीबाई नाट्य मंदिर, कल्याण पर्यंत रात्रीचा प्रयोग संपल्यानंतर पालिकेने बस सेवा उपलब्ध करुन देण्याची सूचना दामले यांनी आयुक्त दांगडे यांना केली.अत्रे रंगमंदिरात रंगीत तालीम कक्ष सुरु करण्या बरोबर नुतनीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आवश्यक सुविधा दिल्या जातील, असे आयुक्त दांगडे यांनी सांगितले.
(डोंबिवली रेल्वे स्थानका जवळ नाटकांच्या तिकीट विक्री केंद्रावरुन तिकीट खरेदी करताना अभिनेते प्रशांत दामले.)