डोंबिवली- डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकातील दिवा बाजुकडील पादचारी पुलाचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येत्या सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेच्या एका उच्चपदस्थ सुत्राने दिली. या पादचारी पुलामुळे कोपर पश्चिम भागातील पादचाऱ्यांना डोंबिवली पूर्वेतील आयरे, म्हात्रेनगर भागात आणि पूर्वेतील नागरिकांना कोपर पश्चिमेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई, डोंबिवलीकडून कोपर रेल्वे स्थानकात लोकलने दिवा बाजू दिशेला उतरणाऱ्या प्रवाशांना माघारी येऊन डोंबिवली बाजूकडील जिन्याने इच्छित स्थळी जावे लागत होते. अनेक महिला, पुरुष प्रवाशी हा द्रविडीप्राणायम टाळण्यासाठी रेल्वे मार्गातून येजा करत होते. त्यामुळे कोपर रेल्वे स्थानक भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येत्या सोमवारी पादचारी पूल खुला होणार असल्याने कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना वळसा घेऊन जाणे, रेल्वे मार्गातून जाण्याचा त्रास वाचणार आहे. तसेच कोपर पश्चिम भागातील नागरिकांनी डोंबिवली पूर्व, आयरे, म्हात्रेनगर, ज्योतीनगर भागात जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिन्यावरुन रिक्षेने जावे लागत होते. डोंबिवली पूर्व आयरे, म्हात्रेनगर, बालाजी गार्डन संकुल भागातील नागरिकांना कोपर रेल्वे स्थानकात येण्यासाठी डोंबिवली स्थानक दिशेेने एकच जिना आहे.
कर्जत, कसारा ते कळवा, मुंब्रा परिसरातील अनेक नागरिक वसई, पालघर, डहाणू भागात जाण्यासाठी कोपर रेल्वे स्थानकात उतरून अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून पनवेल, वसई भागात जातात. दिवसेंदिवस कोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी दिवा स्थानकाप्रमाणे वाढत आहे. डोंबिवली पूर्व आयरे, म्हात्रेनगर, बालाजी गार्डन ते आगासन, दातिवली दिशेने शेकडो बेकायदा चाळी भूमाफियांनी बांधल्या आहेत. स्वस्तामध्ये या चाळींमध्ये घर मिळते. कोपर रेल्वे स्थानका पासून हाकेच्या अंतरावर घर असल्याने अनेक नागरिक या बेकायदा चाळी, या भागातील बेकायदा इमारतींमध्ये घर घेण्याला प्राधान्य देतात. या भागातील नागरिकांचा भार कोपर रेल्वे स्थानकावर येत आहे.
आगासन, दातिवली, म्हातार्डेश्वर गावांमधील बहुतांशी नागरिक, शाळकरी मुले रेल्वे मार्गातून डोंबिवली, कोपर भागात शाळेत येतात. दिवा बाजुला कोपर रेल्वे स्थानकात जिना नसल्याने हे प्रवासी, विद्यार्थी रेल्वे रुळ ओलांडून इच्छित स्थळी जातात. अशा सगळ्या प्रवाशांची कोपर रेल्वे स्थानकातील नव्या जिन्यामुळे सोय होणार आहे.
तीन वर्षापासून काम
कोपर रेल्वे स्थानकात दिवा बाजूला तीन वर्षापासून पादचारी जिना उभारणीचे काम सुरू होते. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे हे काम सुरू होते. करोना महासाथीच्या काळात हे काम थांबले होते. दरम्यानच्या काळात निधीची उपलब्धता नसल्याने हे काम रखडले होते. या पुलाच्या कामासाठी निधीची उपलब्धता होताच, गेल्या आठ महिन्यापासून पादचारी पुलाचे काम वेगाने सुरू होते. आता हे काम पूर्ण होत आले आहे. या पुलाच्या कामातील लहान कामे पूर्ण केली जात आहेत. येत्या सोमवारी हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येईल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ सुत्राने सांगितले.