डोंबिवली: डोंबिवलीत घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने रहिवासी, उद्योजक हैराण आहेत. काही चोऱ्या दिवसाढवळ्या केल्या जात आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गही चिंताग्रस्त आहे. जुनी डोंबिवलीतील भारत माता शाळेजवळील आशीष व्हिला इमारतीत राहत असलेल्या कविता जाधव या खासगी नोकरी करतात.
नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या असताना त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा चोऱट्यांनी सकाळी १० ते दुपारी तीन वेळेत तोडून घरातील कपाटातील १ लाख ७१ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज, रोख रक्कम चोरून नेली. दुपारी घरी आल्यानंतर कविता यांना घरात चोरी झाल्याचे समजले. विष्णुनगर पोलीस ठाण्यात कविता जाधव यांनी तक्रार केली आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील सितसन प्रोसेस कन्ट्रोल सिस्टिम कंपनीच्या संरक्षक भिंतीवरुन कंपनीत प्रवेश करुन चोरट्यांनी एक लाख १० हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले. शनिवारी रात्री ही चोरी करण्यात झाली आहे. कंपनीतील भांडार कक्षातील किमती साहित्य, सीसीटीव्ही नियंत्रकाची तोडफोड करुन चोरटा पळून गेला आहे. दुसऱ्या दिवशी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या चोरीचा प्रकार निदर्शनास आला. कंपनी कर्मचारी दत्ता काळे यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात अशाप्रकारच्या चोऱ्या होत होत्या. आता दिवसाढवळ्या बंद घरांवर पाळत ठेऊन चोऱ्या होत असल्याने रहिवासी हैराण आहेत.