लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण पूर्वेत शिवसेना-भाजप मध्ये धुसफूस सुरू आहे. याची माहिती असूनही त्याकडे शिवसेना, भाजपकडील दोन्ही नेत्यांनी दुर्लक्ष केले. या समन्वयाच्या अभावामुळे आलेल्या नैराश्यातून ही दुर्देवी घटना घडली आहे, अशी माहिती कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांना दिली.

कल्याण पूर्वेत भाजप आमदाराकडून गोळीबाराची घडलेली घटना चुकीची आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, असे करण्या पर्यंतची वेळ का आली ,याचाही विचार करण्याची गरज आहे. एखादी घटना सतत घडत असेल आणि त्या विषयी कोणीही काही करत नसेल. न्याय मिळत नसेल तर नैराश्य येते. या उव्दिग्नेतून गोळीबाराचा प्रकार घडला आहे, असे माजी आमदार पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा-जितेंद्र आव्हाड यांचा अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव, आनंद परांजपे यांची टीका

या घटनेमुळे शिवसेना, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अनाश्यक दुरावा निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका पाहता हा दुरावा युतीला परवडणारा नाही. त्यामुळे शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन हा दुरावा दूर करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असे माजी आमदार पवार यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवर काही अडचणी होत्या. त्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण त्याची दखल शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी न घेतल्याने आलेल्या नैराश्यातून दुर्देवी प्रकार घडला. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले असले तरी, शिवसेना-भाजपचे नेते सामंजस्याने हा विषय संपुष्टात आणतील. केवळ एक घटनेमुळे युतीत तणाव निर्माण होणार नाही. यावर आमचा विश्वास आहे. राज्यात येत्या काळात विकासाचे अनेक पकल्प, विविध कामे मार्गी लावायची आहेत. हे काम युतीचे नेतेच करतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. युतीमधील स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या दुराव्याच्या विषयावर तातडीने बैठक घेण्याची मागणी पवार यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Incident of firing due to lack of coordination between shiv sena bjp says narendra pawar mrj