ठाण्यातील इंदिरा नगर येथील स्व.संजय गांधी भाजी मंडई येथे कित्येक दिवसांपासून सुविधांची वानवा आहे. मंडई परिसरात दररोज भरणाऱ्या बाजारामधून भाजीबरोबरच आजारही फुकटात मिळत असल्याची परिस्थिती आहे. दरुगधी व घाणीमुळे येथून साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. रस्त्यांची अस्वच्छता, ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडय़ा, दरुगधीयुक्त पदार्थ व त्याच्याशेजारीच बसून होणारी भाजी विक्री असा धक्कादायक प्रकार सध्या मंडईत पाहायला मिळतो. येथील भाजी मंडईही एका चिंचोळ्या रस्त्यांवर मांडण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून अजून तरी या भाजी मंडईला अधिकृत दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील स्वच्छता व नियोजनाकडे पालिकेने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. येथील भाजी विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भाजी मंडईच्या बाजूलाच मासळी बाजार असून तेथील कचऱ्याची दरुगधी या भागात पसरलेली असते.
पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांकडून सकाळी सात वाजताच दिवसातून एकदा स्वच्छता केली जाते. मात्र त्यानंतर दिवसभर पडणाऱ्या कचऱ्यामध्येच भाजी विक्रेत्यांना बसावे लागते. अशा दरुगधीयुक्त वातावरणामध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत विक्रेत्यांना आपल्या मालाची विक्री करण्यासाठी बसावे लागत आहे. भाजी मंडईत स्वच्छता करण्याची मागणी व्यापारी व भाजी विक्रेत्यांकडून केली जात असूनही पालिकेचे कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भाजी मंडईमध्ये साचत असलेल्या कचऱ्यापासून अनेक आजारांचा फैलाव होत आहे. ताजा माल असूनही भाज्यांवर बसणाऱ्या माश्यांमुळे व जवळच्या कचऱ्यामुळे आजार होण्याच्या भीतीने नागरिकांकडून भाजी खरेदी केली जात नाही.