ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाड्यांना जोडणारे रस्ते उपलब्ध नसल्याने अनेकांना वेळेत उपचार मिळू शकत नाही. रस्त्याअभावी रुग्णांना डोलीने नेण्याची वेळ येते. रुग्णालयात उशिरा पोहोचल्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यातील १६१ पाडे मुख्य रस्त्याला जोडण्याचा प्रस्ताव तयार केला असून तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. १३४.३६५ किलोमीटरचे हे रस्ते असणार आहेत. यासाठी ७९ कोटी ४३ लाख ५० हजार इतका खर्च येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी भागात आदीवासी पाडे आहेत. या पाड्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा आदिवासींना एखादा आजार झाल्यास आरोग्य केंद्रावर जाताना मातीच्या रस्त्यातून किंवा शेतातील पायवाटेतून जावे लागते. पाड्यांपर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने गरोदर महिलांना डोली तयार करून मुख्य रस्त्यावर आणावे लागते. रुग्णालयात वेळेत पोहोचू न शकल्यामुळे अनेक गरोदर महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. वाडे, पाडे आणि गावे ज्या रस्त्यांना जोडले नाहीत. तेथील रस्ते तयार करण्याचा निर्णय राज्य सरकाने घेतला होता. त्यानुसार, ऑगस्टमध्ये ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना’ तयार केली होती. या योजनेअंतर्गत पाडे, गावातील रस्ते मुख्य रस्त्यांना जोडण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील १६१ पाड्यांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल, असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सर्व पाड्यात २० हजारांहून अधिक आदिवासी वास्तव्यास आहेत. त्यामुळे आदिवासींना मोठा दिलासा मिळाणार आहे. १६१ पाडे मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी १३४.३६५ किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यासाठी ७९ कोटी ४३ लाख ५० हजार इतका खर्च येणार आहे.
हेही वाचा – राज्य सरकारच्या वेगवान हालचाली; दिघी बंदरालगतच नवे ड्रग पार्क
हेही वाचा – ठाणे : दिघी बंदरालगतच नवे ड्रग पार्क, सुसाध्यता तपासण्यासाठी एमआयडीसीकडून हालचाली
तालुका – रस्त्यांची संख्या
शहापूर – ६४
मुरबाड – ३२
भिवंडी – ६५
एकूण – १६१