कवी केशवसुतांपासून ते अलीकडच्या तरुणाईच्या नवोदित कवितांपर्यंत.. सोबत निसर्ग कविता, हास्य कविता, माणसाच्या सुख-दु:ख आणि जगण्याच्या कवितांची आनंदयात्रा.. कवितांना संगीत, नाटय़ व नृत्याचा साज, असा अनोखा काव्योत्सव मंगळवारी ठाण्यात रंगला होता.
अक्षर चळवळ संस्था आणि नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठी कविताविश्वाचा ठाव घेणारा काव्योत्सव या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमातील शुभारंभाचा प्रयोग मंगळवार डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे करण्यात आला. यावेळी पानिपतकार विश्वास पाटील, अभिनेते अभिराम भडकमकर आणि आयोजक सुधाकर चव्हाण उपस्थित होते.
कवितांना संगीत, नृत्य आणि नाटय़ाचा साज चढवणाऱ्या काव्योत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, नलेश पाटील, लोकशाहीर संभाजी भगत, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेत्री फैयाज, संगीतकार कौशल इनामदार, गायिका अनुजा वर्तक, गायक गांधार जाधव, सचिन मोहिते, झपूर्झाचे ६० रंगकर्मी आणि नूपुर नृत्यालयाच्या १६ नर्तकांनी आपली कला सादर केली.
मोगरा फुलला, हसरा नाचरा जरासा लाजरा या कवितेसोबत हसत नाचत बागडणाऱ्या मुलींच्या नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. कवी अरुण म्हात्रे यांनी या नभाने या भुईला गान द्यावे, गेले ते दिन गेले, मिठी नदी हे नाव पुन्हा सातबाऱ्यावर आले या कविता सादर केल्या. त्यानंतर नभ उतरू आलं, हिरवे हिरवे गार गालिचे, ओळखलंत का सर मला या कविता झाल्यावर शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या कविता कशा बदलत गेल्या याची गुंफण सादर करण्यात आली.
फैयाज यांनी चार होत्या पक्षिणी त्या, तुम्ही माझे सावकार ही गीते सादर करून मैफिलीला सुरेल किनार जोडली. मानसीचा चित्रकार तो, बगळ्यांची माळफुले या कवितांचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या अखेरच्या पर्वामध्ये दिग्गज कवींचे कविसंमेलन रंगले. यामध्ये संगीतकार कौशल इनामदार यांनी बालकवींची मोहिनी आणि स्पृहा जोशी यांनी शांताबाईंची पैठणी या कविता सादर केल्या. संभाजी भगत यांनी बहय़ा पहाटेच्या ग पारी, धक्का चावडीला ग देतो, ऐ हिटलर के साथी जनाजों के बाराती या कविता भारदस्त आवाजात सादर केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा