लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : जिल्ह्यात गेल्या १५ दिवसात मलेरियाचे २५ तर, डेंग्यू चे ११ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे पावसाळा सुरू होताच साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. साथ आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यासह पालिकांच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाल्या असून त्यांनी उपाययजोना आखण्यास सुरूवात केली आहे.

पावसाळ्याच्या कालावधीत विशेष करुन डेंग्यू आणि मलेरियाची साथ मोठ्याप्रमाणात पसरत असते. जिल्ह्यात सध्या तरी ऊन आणि पावसाचा खेळ सुरु असल्याचे दिसून येत आहे. सलग पाऊस कोसळत नसल्यामुळे वातावरणात पुन्हा उकाडा वाढतो आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. ताप, सर्दी, खोकला आणि अंगदुखी या आजारांनी डोके वर काढले आहेत. यामध्ये तापाची साथ मोठ्याप्रमाणात असल्याची माहिती ठाण्यातील खासगी दवाखान्याचे डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली. ज्या रुग्णांना वारंवार ताप येतो आहे, त्यांनी तात्काळ चाचणी करुन घ्यावी, डेंग्यू किंवा मलेरियाची लागण झाली नाही ना हे पहावे, असा सल्ला त्यांनी नागरिकांना दिला आहे.

आणखी वाचा-मुंबई-नाशिक महामार्गावरील कोंडी आणखी वर्षभर, महामार्गाचे ६० टक्के काम पूर्ण

पावसाळ्याच्या कालावधीत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात पसरु नये यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. यात, धुर फवारणी करणे, घरात साठविलेल्या पाण्यातील जंतू नष्ट करणे अशा विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, भितीपत्रकांच्या माध्यमातून साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यंदाही ठाणे महापालिकेकडून शहरातील मुख्य चौकात ‘शहर डेंग्यू मलेरिया मुक्त करुया ’ अशा मथळ्याचा फलक लावण्यात आले आहेत. त्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे आजार रोखण्यासाठी कोणती कशी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मलेरियाचे २५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ठाणे १२, कल्याण-डोंबिवली सहा, नवी मुंबई एक, मिराभाईंदर पाच आणि ठाणे ग्रमाणीमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात डेंग्यूचे ठाणे शहरात चार, कल्याण-डोंबिवलीत दोन, नवी मुंबईत दोन आणि ठाणे ग्रामीण मध्ये तीन असे एकून ११ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.