ठाणे : ठाण्यात काही दिवसांपूर्वी दोन ठिकाणी गोळीबार करून एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणखी एक गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवा येथे एका सुरक्षारक्षकाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उत्साहाच्या भरात हवेत दोन गोळ्या झाडल्या. केदारनाथ राजभर (६६) असे त्याचे नाव असून याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या सुरक्षा रक्षकाला ताब्यातही घेतले आहे.

दिवा येथील मुंब्रा काॅलनी भागात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गोळीबारीचा आवाज झाल्याचा एक संदेश समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. एका व्यक्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी हा गोळीबार झाल्याचे त्या संदेशात लिहिण्यात आले होते. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात दोन ठिकाणी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

हेही वाचा : विश्लेषण: ठाण्यात गुन्हेगारीचा आलेख वाढतोय? शांत, सुसंस्कृत शहराची अशी अवस्था कशामुळे? हे पोलिसांचे अपयश?

मुंब्रा पोलिसांनी ज्या व्यक्तीचा वाढदिवस होता. त्याची तसेच त्याच्या परिचितांची चौकशी केली. त्यावेळी वाढदिवसाच्या ठिकाणी गोळीबार झाला नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पुन्हा परिसरात नागरिकांची चौकशी केली असता त्यावेळेस तेथील रहिवासी केदारनाथ राजभर याने हवेत गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री १२ वाजता उत्साहाच्या भरात हवेत दोन गोळ्या झाडल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून परवाना असलेली १२ बोअरची बंदूकही जप्त केली आहे.