जिल्ह्यातील तरुण मतदारांच्या संख्येत वाढझाल्याचे चित्र दिसून आले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला होता. मतदार संख्येत ७९ हजार ५६२ एवढी वाढ झाली असून यात १८ ते १९ वयोगटातील सुमारे १९ हजार ३९४ नव मतदार तर २० ते २९ वयोगटातील सुमारे ३० हजार ४७१ मतदारांनी नव्याने वाढ झाली आहे.
हेही वाचा >>>मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर अपघातांमध्ये वाढ, दोन वर्षात तब्बल इतक्या मृत्यूंची नोंद
मतदारांच्या नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनासाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठका घेऊन मतदार नोंदणी करण्यासाठी विविध उपाय योजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी पाठपुरावा करून मतदार नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
प्रारुप मतदार यादीत जिल्ह्यात ३३ लाख २८ हजार ९ पुरुष, २८ लाख ६ हजार ९३ महिला आणि इतर ८५३ असे मिळून ६१ लाख ३४ हजार ९५५ मतदार होते. अंतिम मतदार यादीत ही संख्या ७९ हजार ५६२ ने वाढून पुरुष ३३ लाख ६७ हजार १२० मतदार, महिला २८ लाख ४६ हजार ३१९ आणि १०७८ मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता ६२ लाख १४ हजार ५१७ मतदार झाले आहेत.
हेही वाचा >>>ठाकरे गटाला धक्का, कल्याण मध्ये ठाकरे समर्थक शिंदे गटात सामील
अंतिम यादीनुसार जिल्ह्यात युवा मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या एकत्रिकृत प्रारुप मतदार यादीत १८ ते १९ वयोगटातील २६ हजार ७०५ मतदार होते. अंतिम मतदार यादीत ही संख्या १९ हजार ३९४ ने वाढून ४६ हजार ९९ एवढी झाली आहे. तसेच २० ते २९ वयोगटातील प्रारुप यादीत ९ लाख ९० हजार ९८४ मतदारांची नोंदणी होती. अंतिम यादीत ही संख्या ३० हजार ४७१ ने वाढून १० लाख २१ हजार ४५५ एवढी झाली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीत एटीएम कार्डची अदलाबदल करुन २५ हजार रुपयांची फसवणूक
१७ वर्षांवरील १७ हजार ३८८ भावी मतदारांनी केली नोंदणी
मतदार संख्या वाढावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी, १ फेब्रुवारी, १जुलै आणि १ऑक्टोबर या चार अर्हता दिनांक घोषित केल्या आहेत. तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १७ वर्षांपुढील भावी मतदारांच्या नाव नोंदणीसाठी विशेष समर्पित सहायक मतदार नोंदणी अधिकारी नेमण्यात आले होते. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या मोहिमेत जिल्ह्यात १७ वर्षे पूर्ण झालेल्या भावी मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून जिल्ह्यात सुमारे १७ हजार ३८८ युवकांनी विधानसभा मतदारसंघ स्तरावर अर्ज केले आहेत.
विशेष कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत झालेली वाढ
दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ ५ जानेवारी, २०२३
पुरुष ३३,२८,००९ ३३,६७,१२०
स्त्री २८,०६,०९३ २८,४६,३१९
इतर ८५३ १,०७८
एकूण ६१,३४,९५५ ६२,१४,५१७