ठाणे – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये उमेद्वारांच्या अर्जाच्या नावांची घोषणा होण्याआधीच प्रचार साहित्य खरेदीची लगबग सुरू झाली आहे. यंदा या प्रचार साहित्यांमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकांमुळे सर्वत्र राजकीय मंडळी आणि कार्यकर्ते पक्षाच्या कामाला लागले आहेत. उमेदवाराचा प्रचार करत असताना सभा किंवा नागरिकांच्या भेटीगाठी घेताना आपल्या पक्षाचे चिन्ह उमेदवाराचा फोटो असलेले फलक, झेंडे, आणि स्कार्फ यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. प्रचाराच्या वातावरणनिर्मितीसाठी सध्या विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. सभा आणि राजकीय कार्यक्रमांसाठी प्रचार साहित्याची गरज राजकीय पक्षांना भासते. त्यासाठी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन्ही गट या प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष तसेच इतर पक्षांचे नाव, नेत्यांची नावे असलेले प्रचार साहित्य दाखल झाले आहे. त्यात झेंडे, धातूचे बिल्ले, प्लास्टिक बिल्ले, टोपी, रुमाल, फिती इत्यादींचा समावेश आहे. यंदा दिवाळी आणि निवडणुक एकावेळी आल्याने प्रचार साहित्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर यंदा प्रचार साहित्यामध्ये चष्मा हा नव्याने तयार करण्यात आला आहे. यावर सर्व पक्षाचे चिन्ह छापण्यात आले आहेत. प्रचार साहित्य तयार करण्यासाठी एक महिना आधीपासून तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या साहित्यांमध्ये स्वतंत्र पक्षाचे साहित्य अधिक तयार केले जाते. तसेच इतर पक्षाचे मागणीनुसार साहित्य तयार केले जाते, असे विक्रेत्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“मताधिक्य द्या, कथोरे मंत्रिमंडळात दिसतील”, विनोद तावडेंचे सूचक विधान, किसन कथोरेंनी भरला अर्ज

ठाणे शहरात सर्व उमेद्वारांच्या अर्जाच्या नावांची घोषणा होण्याआधीच उमेद्वार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ५० टक्क्यांहून अधिक प्रचार साहित्यांसाठी दुकानांमध्ये मागणी आल्या आहेत. शहरात अहमदाबाद, दिल्ली आणि सुरत या ठिकाणाहून प्रचार साहित्यासाठी लागणारा कच्चा माल दाखल होत आहे. तर ठाणे शहरातून जालना, औरंगाबाद, अहमदाबाद, पिंपरी – चिंचवड, शिर्डी, संगमनेर, झारखंड या ठिकाणी प्रचार साहित्य पोहचले आहे. त्याचप्रमाणे यंदा पाच ते साडे सात फुटांपर्यंत झेंडे तयार करण्यात आले आहेत. तसेच १०० मिटरचे पक्ष चिन्ह असलेले पट्टे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये देखील १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे साहित्य विक्रेते अरविंद साबू यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in rate of campaign materials for maharashtra assembly elections thane news amy