उल्हासनगर शहराच्या जवळून वाहणाऱ्या उल्हास नदीला म्हारळजवळ एक मोठा नाला येऊन मिळतो. या नाल्यातून फेसाळ सांडपाणी मोठ्या प्रमाणात थेट नदीत येऊन मिसळत असल्याचे समोर आले आहे. रविवारी रासायनिक दुर्गंध असलेले फेसाळ सांडपाणी यात मिसळत होते. विशेष म्हणजे येथून काही मीटर अंतरावर लाखो नागरिकांची तहाण भागवण्यासाठी महत्वाच्या असलेली उचल केंद्र आहेत. त्यामुळे प्रदुषणाच्या मोहिमांवरून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या प्रशासनाने प्रदुषणाकडे लक्ष देण्याची मागणी होते आहे.
ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहराची पाणी पुरवठ्यासाठीची मदार उल्हास नदीवर आहे. मात्र गेल्या काही वर्षात उल्हास नदीच्या प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बदलापूर शहरात येण्यापूर्वी उल्हास नदीच्या पात्रात अनेक नाले येऊन मिळतात. बदलापूर शहरातही असेच सांडपाणी वाहून नेणारे नाले नदीला येऊन मिळतात. येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प रखडले आहेत. येथूनच काही अंतरावर जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाण्याची उचल केली जाते. बारवी धरणातून नदीच्या माध्यमातून हे पाणी उल्हास नदीला येऊन मिळते. मात्र उल्हास नदीचे प्रदुषण इथेच थांबत नाही. नदीकिनारच्या गावांचे सांडपाणीही नदीला मिळते. हे कमी की काय उल्हासनगर शहराच्या प्रवेशद्वारावर म्हारळ गावातील मोठा नाला उल्हास नदीला येऊन मिळतो. या नाल्याच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यात अजुन तरी यश आलेले नाही. मात्र या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी त्यातही फेसाळ सांडपाणी नदीत येऊन मिसळत असल्याचे समोर आले आहे. हे सांडपाणी रासायनिक असल्याचे समोर आले. त्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंध येत होता तर हे सांडपाणी फेसाळ असल्याचेही समोर आले. प्रदुषण मुक्त नदीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रर्यावरणप्रेमींकडून ही बाब उजेडात आणण्यात आली. धक्कादायक म्हणजे कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर शहरासाठी पिण्याच्या पाण्याची उचल ज्या ठिकाणी केली जाते ते पाणी उचल केंद्र या नाल्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे. त्यामुळे या पिण्याच्या पाण्यावरही या सांडपाण्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होते आहे.
प्रतिक्रियाः या नाल्यातून नागरी सांडपाणी येत असते. मात्र पहिल्यांदाच रासायनिक सांडपाणी येथे पहायला मिळाले. या सांडपाण्याला खुप फेस होता. तसेच पाण्यातून दुर्गंधीही येत होती. नाल्याजवळ आलो असता डोळे चुरचुरणे आणि घसा खवखवण्याचा अनुभव आला. यावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, अशी माहिती उल्हासनदी जल बिरादरी शशीकांत दायमा यांनी दिली.
हेही वाचा- कल्याणमध्ये खडकपाडा भागात दोन टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त
चला जाणूया नदीला या मोहिमेत उल्हास नदीची पाहणी करण्यात आली होती. मात्र हे प्रदुषणकारी नाले बंद करण्यासाठी काय सुरू आहे याबाबत माहिती नाही. एकीकडे उल्हास नदीत दररोज लाखो लीटर सांडपाणी मिसळत असताना दुसरीकडे कागदोपत्री नदी संवर्धनाचे अभियान जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.