ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमधील अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्यांना त्यात फारसे यश येताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. या शहरांमध्ये गेल्यावर्षी ७१४ अपघात झाले तर, यंदा दहा महिन्यांतच ७७४ अपघात झाले आहेत. यामुळे अपघातांच्या संख्येत ६० ने वाढ झाली असून हा आकडा वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढू शकतो. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात येतात. या शहरातून पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा रोड, कर्जत-बदलापूर रोड आणि घोडबंदर असे महत्त्वाचे मार्ग जातात. या मार्गांवरून अवजड तसेच इतर वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे. या मार्गांवर गेल्या काही वर्षात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या शहरांमध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत ७७४ अपघातांची नोंद करण्यात झाली आहे. यात १७२ जणांचा मृत्यू तर, ४६३ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. २१४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गेल्यावर्षी म्हणजेच, १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ७१४ अपघातांची नोंद आहे. यामध्ये १८७ जणांचा मृत्यू तर ३७४ जण गंभीर जखमी झाले आहेत. २५२ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यंदाच्या अपघात संख्येत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यातील आकडेवारीचा समावेश झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मृतांच्या संख्येत मात्र घट झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – ठाणे : अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन यंदा वाशीत, ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत आयोजन

सर्वाधिक अपघात हे ठाणे शहरातील घोडबंदर, भिवंडी आणि डोंबिवली येथील मानपाडा भागात झाले आहेत. घोडबंदरमध्ये १२३ अपघातांची नोंद झाली आहे. त्यापैकी घोडबंदरमधील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५५, कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५० आणि चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ अपघातांची नोंद झाली आहे. तर, भिवंडीतील नारपोली भागात ६५ अपघातांची नोंद आहे. डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६२ अपघातांची नोंद आहे.

यंदाच्या वर्षातील अपघातांमध्ये १७२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ८१ जण हे दुचाकीस्वार आणि ६५ पादचारी, रिक्षातून प्रवास करणारे १२, मोटारीतून प्रवास करणारे चार, ट्रक अपघातात दोन, बसगाडी अपघातात एक, एका सायकलस्वाराचा आणि इतर वाहनांच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. बहुतांश अपघात अवजड वाहनांच्या चाकाखाली येऊन झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा – ठाणे : घोडबंदर, माजिवडा प्रवास नकोसा

अपघात वाढले आहेत. परंतु मृतांचे प्रमाण कमी झाले आहे. काही अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना केल्याने हे प्रमाण कमी झाले. दुचाकीस्वारांचे प्रमाण अपघातात अधिक आहे. – डाॅ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा.

कोणत्या शहरांत किती अपघातांची नोंद (जखमी आणि मृत्यू)

१) ठाणे ते दिवा – २९१

२) भिवंडी शहर – १२३

३) डोंबिवली-कल्याण – १९७

४) उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर – १६३

एकूण – ७७४

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the number of accidents this year ghodbunder narpoli manpada road accident centers ssb