ठाणे : ठाणे, भिवंडी-निजामपूर मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाने पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी नवीन पंप हाऊसच्या बांधकामाबरोबरच नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाला. हे काम दिड वर्षात पुर्ण करण्याच्या सुचना राव यांनी दिल्याने ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदरला येत्या दिड वर्षात वाढीव पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे हा पाणी पुरवठा अपुरा पडू लागल्याने टंचाईची समस्या निर्माण होते. तसेच जुन्या यंत्रणेमुळे स्टेम प्राधिकरणाला नदी पात्रातून वाढीव पाण्याचा उपसा करणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि १२ किलोमीटरची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय स्टेम प्राधिकरणाने घेतला आहे. मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी विशेष तरतुदी अंतर्गत महापालिकांना राज्य शासनाकडून अनुदान मिळते. त्याअंतर्गत, स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी नवीन पंप हाऊसचे बांधकाम, नवीन जलवाहिनी टाकणे आणि जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे या कामासाठी २७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तांत्रिक मान्यता होऊन सुमारे तीन वर्षे हा प्रकल्प कागदावरच होता. या प्रकल्पासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाठपुरावा केला. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निधीस ऑक्टोबर महिन्यात मान्यता दिल्याने प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ आयुक्त राव यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

हेही वाचा : शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी

स्टेम अंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्रातील वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी टाकरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात आला असला तरी हे काम दीड वर्षातच पूर्ण करावे. त्यामुळे शहरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच, भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणे शक्य होईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. नवीन पंप हाऊसमुळे पाणी उचलण्याची क्षमता वाढणार आहे. शिवाय नव्या जलवाहिनीमुळे पाण्याची गळती रोखली जाईल. सध्या नऊ पंपाद्वारे नदीपात्रातून पाण्याचा उपसा करण्यात येतो. नवीन व्यवस्थेत सहा पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जाणार असून यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय

ठाणे, भिवंडी-निजामपूर मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रांसह जिल्हा परिषद हद्दीतील काही गावांना स्टेम कंपनीकडून सध्या ३०० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. स्टेम प्राधिकरण उल्हास नदीतून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. पाणी उपसा करण्यासाठी उल्हास नदीपात्रात ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचा पंप हाऊस आणि जलवाहीनी आहे. याचे बांधकाम १९८५ मध्ये करण्यात आले होते. आता हे पंप हाऊस जुने झाले असून जलवाहिन्याही जुन्या झाल्या आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. त्यावर मात करण्यासाठी नवीन आणि जास्त क्षमतेचे पंप हाऊस तसेच जलवाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in water supply to thane bhiwandi mira bhainder water lifting capacity will be increased css