दोनशे ते दीड हजार रुपयांपर्यंत वाढ
ठाणे : महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टय़ा, गृहसंकुलांमधील मलनि:सारण टाकी साफसफाई करणे, खासगी मालमत्तांमधील कचरा उचलणे आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावणे अशी कामे करण्यात येतात. त्यासाठी महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्काच्या दरात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यानुसार सेवा शुल्कांच्या रक्कमेत पुढील तीन वर्षांत दोनशे ते दीड हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. या संबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या ३ मार्चला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर केला आहे.
महापालिकेने शहरात मलनि:सारण प्रकल्पांची कामे हाती घेतली होती. यापैकी काही भागातील प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत तर, काही भागांमध्ये अद्यापही हे प्रकल्प सुरू झालेले नाहीत. अशा भागांमधील इमारती, झोपडपट्टय़ा, बैठय़ा चाळी याठिकाणी मलनि:सारणाच्या टाकी आहेत. या टाक्यांची महापालिकेच्या माध्यमातून साफसफाई करण्यात येते. खासगी मालमत्तांमधील कचरा उचलणे आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावणे अशीही कामे करण्यात येतात. या कामांसाठी महापालिका संबंधितांकडून शुल्क घेते. या सेवा शुल्कांचे दर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने निश्चित केले असून हे दर मार्च २०२२ पर्यंत लागू आहेत. यामुळे पुढील तीन वर्षांकरीता सेवा शुल्कांचे दर प्रशासनाने निश्चित केले असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी १,७५० रुपये आकारले जात होते. नव्या दरानुसार २०२२-२३ या वर्षांत १,९५० रुपये, २०२३-२४ मध्ये २,१५० रुपये, २०२४ -२५ मध्ये २,३५० रुपये आकारले जाणार आहेत. गृहसंकुलामध्ये उपसा पंपाच्या वाहनामार्फत साफसफाई करण्यासाठी १,७५० रुपये आकारले जात आहेत. नव्या दरानुसार २०२२-२३ मध्ये १,९५० रुपये, २०२३-२४ मध्ये २,१५० रुपये, २०२४ -२५ मध्ये २,३५० रुपये आकारले जाणार आहेत. व्यापारी संकुल, हॉटेल आणि लॉजच्या इमारतीमध्ये सक्शन पंपाच्या वाहनामार्फत साफसफाई करण्यासाठी २,९०० रुपये आकारले जात आहेत. नव्या दरानुसार २०२२-२३ मध्ये ३,१०० रुपये, २०२३-२४ मध्ये ३,३०० रुपये, २०२४ -२५ मध्ये ३,५०० रुपये आकारले जाणार आहेत.
ठाणे शहराबाहेर उपसा पंपाच्या गाडी मार्फत टाक्यांची साफसफाई करण्यासाठी ७,१५० रुपये घेतले जातात. २०२२-२३ या वर्षांत ७,६५० रुपये, २०२३-२४ मध्ये ८,१५० रुपये, २०२४ -२५ मध्ये ८,६५० रुपये आकारले जाणार आहेत. खासगी मालमत्तांमधील कचरा, रॅबीट, चिखल उचलण्यासाठी ८, ७०० रुपये घेतले जात होते. नव्या दरानुसार २०२२-२३ या वर्षांत ९,२०० रुपये, २०२३-२४ मध्ये ९,७०० रुपये, २०२४ -२५ मध्ये १०,२०० रुपये आकारले जाणार आहेत.