ठाणे महापालिका क्षेत्रात बेसुमार पाणी वापराला लगाम बसावा आणि पाणी वापराप्रमाणे देयकांची वसुली व्हावी या उद्देशातून प्रशासनाने जलमापके बसविली आहेत. या जलमापकांच्या नोंदीद्वारे महापालिकेकडून ग्राहकांना देयके पाठविण्यास सुरुवात झाली असून हि देयके वाढीव असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. यापुर्वी वर्षाकाठी १ हजार ५०० च्या आसपास देयक येत होते. परंतु आता तीन ते चार हजारांच्या आसपास तीन महिन्यांची देयके पाठविण्यात आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. दरम्यान, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक चुकांमुळे असा प्रकार घडत असून अशा तक्रारदारांच्या देयकात दुरुस्ती करून दिली जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उल्हासनगर : इमारतीचा स्लॅब कोसळून चार मृत्युमुखी ; कॅम्प पाच भागातील घटना, बचावकार्य सुरू

ठाणे महापालिका क्षेत्रातील चाळी आणि झोपडपट्टी भागात ठोक पद्धतीने पाणी देयके आकारली जात होती. तर, शहरातील इमारतींमध्ये घरांच्या क्षेत्रफळानुसार पाणी देयकांची आकारणी केली जात होती. जलमापके बसविण्यात आलेली नसल्यामुळे पाणी वापर नेमका किती होतो, याचा अंदाज पालिका प्रशासनाला येत नव्हता. तसेच ठोक पद्धतीने देयके आकारली जात असल्यामुळे चाळी आणि झोपडपट्टी भागात पाण्याचा बेसुमार वापर केला जात होता. घरासमोरील रस्ते आणि वाहने पाण्याने धुणे असे प्रकार घडत होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने नळ जोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला होता. त्यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर जलमापके बसविण्याची कामे सुरु झाली होती. करोना काळात जलमापके बसविण्याची कामे संथगतीने सुरु होती.

हेही वाचा >>> डोंबिवलीत भाजी विक्रेत्याची भामट्या रिक्षा चालकाकडून फसवणूक

ठाणे महापालिका क्षेत्रातील १ लाख १३ हजार ३२८ नळ जोडण्या असून त्यात रहिवास आणि वाणिज्य अशा दोन्ही नळजोडण्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ८६ हजार नळजोडण्यावर जलमापके बसविण्यात आली आहेत. त्यापैकी गेल्यावर्षी मार्च महिन्यापुर्वी ४८ हजार जलमापके बसविण्याची कामे पुर्ण झाली होती. या नळजोडणीधारकांना गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून जलमापकाद्वारे देयके पाठविण्यात येत आहेत. सुरुवातीला त्यांना वाढीव देयके देण्यात आल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तशाच प्रकारच्या तक्रारी यंदाही आल्या आहेत. गेल्या वर्षभरात २२ हजार जलमापके बसविण्यात आली असून त्यांना यंदाच्या एप्रिल ते जून अशी तीन महिन्यांची देयके पाठविण्यात आली आहेत. हि देयके वाढीव असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. याच संदर्भात भाजपचे माजी नगरसेवक संदीप लेले यांच्यासह काही नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे वाढीव देयकांच्या तक्रारीचा पाढा वाचला. यापुर्वी वर्षाकाठी १ हजार ५०० च्या आसपास देयक येत होते. परंतु आता तीन ते चार हजारांच्या आसपास तीन महिन्यांची देयके पाठविण्यात आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> समृध्दी महामार्गात जमिनीचे तुकडे झाल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर मधील शेतकरी अडचणीत

पालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारीमधील ग्राहकांना जलमापकाच्या नोंदीद्वारे एप्रिल ते जून अशी देयके आकारण्यात आली आहेत. परंतु त्यापैकी काही ठिकाणी आधीच जलमापके बसविण्यात आली असून त्या ग्राहकांना पुर्वीप्रमाणे देयके आकारणी केली जात होती. परंतु साॅफ्टवेअरमध्ये देयक बसविल्याच्या तारखेपासून नोंद होत असल्याने तेव्हापासूनची देयक आकरणी होत आहे. त्याचबरोबर काही ग्राहकांनी देयके भरलेली असतानाही त्यांची नोंद साॅफ्टवेअरमध्ये होत नसल्यामुळे जूनी थकबाकी दाखविली जात आहे. या तांत्रिक चुकांमुळे काही ग्राहकांना वाढीव देयके येत आहेत. गेल्यावर्षी ज्या ग्राहकांना देयके आकरण्यात आली, त्यांनाही अशाचप्रकारची देयके आली होती. परंतु त्यांना आता योग्य देयके मिळत आहेत, अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिली. ज्या ग्राहकांना वाढीव देयके आली आहेत, त्यांना देयकातील त्रुटी दुरुस्त करून देयक देण्यात येत आहे असे सांगत अशा तक्रारीसाठी ९१५८०६६२२२ आणि ९१५८०६६१११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increased payments to water meter holders in thane amy