ठाणे – परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत ऑक्टोबर २०२४ मध्ये लोकार्पण केलेले माझी टीएमटी ॲप्लिकेशन काही तांत्रिक कारणामुळे सुरु होऊ शकले नव्हते. अखेर जानेवारी महिन्यापासून माझी टीएमटी ॲप्लिकेशन प्रवाशांसाठी कार्यान्वित करण्यात आले. हे ॲप्लिकेशन प्रवाशांच्या पसंतीस पडत आहेत. दिवसेंदिवस या ॲप्लिकेशनचे वापरकर्ते वाढत असून जानेवारी आणि फेब्रुवारी अवघ्या दोन महिन्यात १८ हजाराहून अधिक प्रवाशांनी या ॲप्लिकेशनचा वापर करुन तिकीट काढल्या असल्याची माहिती ठाणे महापालिका परिवहन विभागाकडून देण्यात आली.
ठाणे शहरातील विविध भागात परिवहन सेवेच्या बस गाड्या धावतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशी तिकीट काढताना वाहकांकडून त्यांना वारंवार सुचना देण्यात येत असते की, तिकीटासाठी सुट्टे पैसे द्यावे. परंतू, अनेकदा प्रवाशांकडे सुट्टे पैसे उपलब्ध नसतात. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसून येतात. यावर पर्याय म्हणून डिजीटल तिकीट सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी प्रवाशांकडुून केली जात होती. त्यानुसार, ठाणे महापालिका परिवहन विभागाने ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘माझी टीएमटी’ या ॲपची निर्मिती केली. परंतू, या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट नसल्यामुळे प्रवाशांना या ॲप्लिकेशनचा वापर करता येत नव्हता. तांत्रिक त्रुटींमुळे हे ॲप्लिकेशन त्यावेळी सुरु करता आले नव्हते. अखेर जानेवारी महिन्यापासून हे ॲप्लिकेशन प्रवाशांसाठी सुरु झाले. जानेवारी महिन्यात चार हजार १६ आणि फेब्रुवारी महिन्यात १४ हजार ९४४ असे एकूण १८ हजार ९६० जणांनी या ॲप्लिकेशनवरुन तिकीट काढल्या आहेत.
या ॲपचा वापर कसा होतो ?
या मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकिट काढता येते. तसेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंगचा वापर करून पैसे भरता येतात. त्याचप्रमाणे, प्रवाशांना बस कोठे आणि किती वेळेत बस थांब्यावर येणार याची माहिती देण्याची सुविधाही या ॲपमध्ये आहे. प्रवाशांना ॲपवर प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण आणि गंतव्य स्थान यांची माहिती भरून बसमार्ग, त्या मार्गावरील उपलब्ध बसगाड्या, त्यासाठी लागणारे तिकिट भाडे याचीही माहितीही समाविष्ट आहे.
ऑनलाईन ॲप्लिकेशनचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि तिकीट शुल्क
महिना – प्रवासी संख्या ऑनलाईन – जमा झालेले तिकीट शुल्क
जानेवारी – ४०१६ – ४८,३०३
फेब्रुवारी – १४,९४४ – २,२२,७५९
एकूण – १८,९६० – २,७१,०६२