डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. काही सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांच्या विरुध्द पालिका आयुक्तांपासून, उपायुक्त ते पालिकेच्या ह प्रभागात तक्रारी करूनही या तक्रारींची दखल पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, म्हणून एका जागरूक नागरिकाने याप्रकरणी मुंबईतील आझाद मैदानात या बेकायदा बांधकामांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

या बेमुदत उपोषणाचा गुरुवारी चौथा दिवस आहे. जोपर्यंत या बेकायदा बांधकामांच्या विरुध्द शासन कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांना या बेकायदा बांधकामांवर जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश देत नाही, तोपर्यंत हे बेमुदत उपोषण आझाद मैदान येथे सुरू राहणार आहे, अशी माहिती उपोषणकर्ते विनोद जोशी यांनी दिली.

गेल्या वर्षी याच बेकायदा बेकायदा बांधकामांच्या विरुध्द आपण आझाद मैदान येथे ४४ दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी पालिकेने शासन आदेशावरून ही बेकायदा बांधकामे तोडण्याची कारवाई केली जाईल, असे आश्वासन आपणास दिले होते. त्यावेळी पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा फक्त देखावा केला. त्यानंतर ही बेकायदा बांधकामे पुन्हा जशीच्या तशी उभी राहिली आहेत, असे जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘देवाभाऊं’च्या फलकांमुळे शहर विद्रूप, आचारसंहितेनंतरही कारवाईचा केवळ दिखावा अनेक ठिकाणी फलक जैसे थे

गेल्या दोन वर्षापासून आपण डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील सखारामनगर काॅम्पलेक्सच्या बाजुला पालिकेच्या बगिचा, उद्यान, शाळा अशा आरक्षित भूखंडावर उभारलेली चार बेकायदा इमारतींची बांधकामे, याच भागात स्मशानभूमी रस्त्यावर, चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागील बांधकाम, रेतीबंदर चौकात अतिथी हाॅटेलसमोर उभारलेल्या तीन इमारती, गावदेवी मंंदिर मैदानाजवळील शशिकांत व मधुकर म्हात्रे यांची बेकायदा इमारत, कुंंभारखाणपाडा येथील हरितपट्ट्यावरील शिव सावलीसह इतर बेकायदा इमारती, खंडोबा मंदिराजवळील बेकायदा इमारत, नवापाडा पालिका शाळेजवळील बेकायदा इमारत, प्रसाद सोसायटी प्रभागातील दत्तमंदिर दोन गल्लीतील बेकायदा इमारत, जुनी डोंबिवली, ठाकुरवाडीतील शिव लिला, मोठागाव भागातील बेकायदा इमारतींच्या तक्रारी पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त यांच्याकडे केल्या आहेत. न्यायालयात जाण्याची आपली आर्थिक परिस्थिती नसल्याने आपण सनदशीर मार्गाने या बेकायदा बांधकामांविरुध्द लढा देत आहोत, असे जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> गर्दी, पाठीवरचे ओझे, वळण मार्गांमुळे डोंबिवली ते मुंब्रा वाढते रेल्वे अपघात

ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी सांगितले, विनोद जोशी यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी केली जात आहे. काही बांधकामांना नोटिसा दिल्या आहेत. बांधकामधारकांना कागदपत्रे सादर करण्याचे कळवून सुनावण्या घेण्यात येणार आहेत. बांधकामधारक कागदपत्रे सादर करण्यास आले नाहीतर ती बांधकामे अनधिकृत घोषित करून तोडली जाणार आहेत.

नगरविकास विभागाचे आदेश

शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष सचिव रश्मिकांत इंगोले यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांना पत्र पाठवून उपोषणकर्ते विनोद जोशी यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने उचित कारवाई करण्याचे आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचे आदेश दिले आहेत.