कल्याण – पालिका, शासनाकडे नियमित पाठपुरावा करूनही उल्हास नदी प्रदूषण मुक्तीसाठी कोणतेही ठोस उपाय योजले जात नसल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आणि या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मी कल्याणकर संस्थेचे कार्यकर्ते नितीन निकम आणि पर्यावरणप्रेमींनी उल्हास नदीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
नदीच्या मध्यभागी जाऊन पाण्यात हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणात माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, माहिती कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, कैलास शिंदे, रवींद्र लिंगायत, शशिकांत दायमा सहभागी झाले आहेत. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात उल्हास खोऱ्यातून वाहणारी उल्हास नदी हा अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीसह अनेक शहरांचा पाणी पिण्याचा मुख्य जल स्त्रोत आहे. या नदी पात्रात विविध ठिकाणाहून प्रदूषित पाणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे बारमाही वाहणारी ही नदी नेहमी प्रदूषित असते. ही नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पालिका, शासन जोपर्यंत ठोस उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते नितीन निकम यांनी केला आहे.
मागील काही वर्षापासून उल्हास नदी प्रदूषण मुक्तीसाठी नितीन निकम पालिका, शासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्तरावर पाठपुरावा करत आहेत. उल्हास नदी पात्रात उल्हासनगर, कल्याण डोंबिवली शहर परिसरातून सुमारे ३० ते ३५ ठिकाणाहून प्रदूषित पाणी शहरात सोडले जाते. मागील अनेक वर्षापासून पर्यावरणप्रेमी, आपण स्वता हे प्रदूषित बंद करावेत म्हणून पालिकेकडे मागणी करत आहोत. दरवर्षी हे प्रदूषित जल स्त्रोत बंद करण्याची फक्त पालिकेकडून आश्वासने दिली जातात. अर्थसंकल्पात घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे उल्हास नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आपण केला आहे, असे नितीन निकम यांनी सांगितले.